मी वेगळी : माझ्या हातची कला

>>  उषा बोर्‍हाडे, भायखळा

माझा संसार सांभाळत आहेच. त्यासाठी नोकरीही करतेय. पण त्यातूनही वेळ काढून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवते. हाच माझा छंद आहे.

कलेची आवड मला अगदी लहानपणापासूनच… आजही मी ती जोपासली आहे. अगदी लग्न होऊन सासरी आले तरीही… एकटी असते तेव्हा मी चित्रे काढते. कलाकुसर बनवते. घरात मी आणि माझे मिस्टर दोघेच असतो. त्यामुळे घरात कामाचा जास्त ताण नसतो. त्यामुळे भराभर कामं आटपून मी कलाकुसरीसाठी वेळ देऊ शकते. रविवारी सुट्टीचा दिवस असला तरी मी लवकर उठून कामं आटपते आणि कलाकुसर करायला घेते. त्यात मी चांगली रमते. गेल्या दोन तीन वर्षांत माझी कलाकुसरीची आवड आणखी बहरली ती युट्युब चॅनलच्या मदतीने. अनेकदा वेळ मिळाल्यावर युट्युबवर बर्‍याच कलाकृती पाहत बसायचे. त्याचवेळी मनात एक विचार आला. लग्न समारंभात, ऑफिसच्या मिटींगमध्ये किंवा प्रवास करतानाही प्लास्टिकच्या असंख्य बाटल्या फेकलेल्या आपण बघतो. त्या बाटल्यांचा काही वापर करता येईल का… मग मी यूट्युबवर सर्च केले आणि त्याचेही उत्तर मिळाले. प्लास्टिकच्या बाटल्या दिसतील तिथून घेऊन यायचे आणि त्यापासून कलाकुसर बनवायचे.

यंदा दिवाळीत लग्नपत्रिकांपासून कंदील तयार केले होते. अलीकडे पत्रिकांवर लोक इतके खर्च करतात की त्या पत्रिका टाकून द्याव्याशा वाटत नाहीत. मी अशा पत्रिका जमा करुन ठेवल्या आणि त्या पत्रिकांपासून यंदा कंदील बनवले. हे कंदीलही लोकांना खूप आवडले. हे सगळं मी पैशांसाठी नाही, तर माझी आवड म्हणून करते. माझ्या जवळच्या लोकांना मी बनवलेल्या वस्तू आवडतात आणि ते घरी या वस्तू त्यांच्या घरी ठेवतात यातच मला आनंद वाटतो.

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करीयर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या सार्‍यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःच शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. तुमच्यातील हे वेगळेपण शोधायला ‘श्रीमती’ही तुमच्या मदतीला आली आहे. चला तर मग… लेखणी उचला आणि तुमचे वेगळेपण फोटोसहित आम्हालाही कळवा. वेगळेपणास नावासहित प्रसिद्धी मिळेल. अ 

आमचा पत्ता : श्रीमती, शेवटचे पान, सद्गुरू दर्शन, नागू सयाजी वाडी, दै. ‘सामना’ मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025 किंवा [email protected] या ईमेलवरही पाठवता येईल.