पोलिसांची माणुसकी; चुकून मुंबईत आल्यानंतर भरकटलेल्या महिलेची घरवापसी

ushadevi-bindh-mumbai-bihar

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुलीसोबत ती बिहारला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसली. एका स्थानकात ती काही कामानिमित्त खाली उतरली आणि बिहारऐवजी चुकून मुंबईच्या ट्रेनमध्ये बसली आणि थेट मायानगरीत पोहचली. येथे आल्यानंतर ती घाबरून गेली. कोणाकडे मदत मागावी, काय करावे हेच तिला सुचनासे झाले. तिच्याकडे जो तो वेडी महिला म्हणून बघू लागले. परिणामी दहा दिवस ती दक्षिण मुंबईत भटकत फिरू लागली, पण कफ परेड पोलीस तिच्या मदतीला आले आणि तिची पुन्हा घरवापसी झाली.

उषादेवी राजकुमार बिंध (40) असे त्या महिलेचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिह्यातल्या जमुनीपूर गावची रहिवासी आहे. 5 नोव्हेंबर रोजी ती बिहारला जाण्यासाठी मुलीसोबत घराबाहेर पडली. त्या दोघी ट्रेनमध्येदेखील बसल्या. पण एका स्थानकात गाडी पकडण्यामध्ये चुकामूक झाली आणि मुंबईची गाडी पकडून उषादेवी थेट सीएसएमटी स्थानकात उतरली. तिची अवस्था दयनीय होती. त्यामुळे कोणी तिच्याकडे बघायला तयार नव्हते. परिणामी घाबरलेली उषादेवी दक्षिण मुंबईत अशीच भटकू लागली. तब्बल दहा दिवस विनाआंघोळ आणि मिळेल ते खाऊनपिऊन दिवस काढत होती. दरम्यान, बुधवारची सकाळ तिच्यासाठी चांगला दिवस घेऊन आली.

कफ परेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक लहू पवार हे मंत्रालय सर्पल येथे बंदोबस्तासाठी तैनात असताना पहाटेच्या वेळेस एक महिला तेथे भटकताना त्यांच्या नजरेस पडली. मळकटलेले कपडे, थकलेल्या त्या महिलेला पाहून पवार यांनी तिला जवळ बोलावले आणि तिची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. पण तिला भोजपुरीशिवाय दुसरी भाषा बोलता येत नव्हती. त्यामुळे मंत्रालय परिसरात असलेल्या भोजपुरी पेपर स्टॉलधारकाला हाताशी घेऊन पवार यांनी महिलेची संपूर्ण माहिती जाणून घेतली. तेव्हा तिचे नाव उषादेवी राजकुमार बिंध असून ती अलाहाबाद जिह्यातल्या जमुनीपूर गावची रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. मी चुकून मुंबईत आली आणि पुढे काय करायचे सुचेनासे झाले. लोक माझ्याकडे वेडी महिला म्हणून बघू लागले. त्यामुळे कोणाकडे मदत मागितली नाही असे तिने पवार यांना सांगितले.

फोनवर पतीचा आवाज ऐकून…

लहू पवार यांनी लागलीच तिला पोलीस ठाण्यात नेले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक रश्मी जाधव यांना तिची माहिती दिली. मग जाधव यांनी पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मदतीने यूपीतील सरायनाथ पोलीस ठाण्याशी संपर्प साधला. तेथील पोलिसांकडून जमुनीपूर गावातील पोलीसपाटलाचा नंबर घेऊन त्याला फोन करून उषादेवी मुंबईत सापडल्याचे त्यांना सांगितले. मग पोलीसपाटलाने उषादेवीच्या पतीला कफ परेड पोलिसांशी संपर्प करून दिला. तेव्हा पतीचा आवाज ऐकल्यानंतर उषादेवीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. मग आम्ही तिच्या घराच्यांना मुंबईत बोलावले व कायदेशीर बाबी पूर्ण करून उषादेवीला तिच्या घरच्यांच्या स्वाधीन केले, असे कफ परेड पोलिसांनी सांगितले.