उषाताई चाटी

10

महेश उपदेव

राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी यांच्या निधनाने समाजकार्यासाठी आपल्या आयुष्याचा होम करणाऱया एका जीवनाची इतिश्री झाली. उषाताई मूळच्या भंडारा येथील रहिवासी होत्या. फणसे कुटुंबात त्यांचा ३१ ऑगस्ट १९२७ साली जन्म झाला. उषाताई बालवयापासूनच राष्ट्र सेविका समितीच्या सेविका होत्या. जुन्या बीए, बीटीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले होते. आपल्या शिक्षणाचा फायदा इतर मुलींना मिळावा याकरिता त्या सतत प्रयत्नशील होत्या. १९४८ मध्ये उषाताईंचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे घोषप्रमुख गुणवंत चाटी यांच्याशी विवाह झाला. नागपुरात आल्यानंतर हिंदू मुलींची शाळा या शाळेत शिक्षिका म्हणून त्यांनी काम केले. राष्ट्रसेविका समितीच्या पहिल्या प्रमुख संचालिका मावशीबाई केळकर यांच्या सान्निध्यात आल्या. मावशीबाई केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली उषाताईंनी समितीचे काम सुरू केले. वाग्मिता विकास समितीच्या जवळजवळ 36 वर्षे अध्यक्ष होत्या. मुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, वक्तृत्वाचे धडे देणे हे विशेष कार्य त्यांनी केले. अनेक मुली त्यांनी तयार केल्या. १९८४ पासून त्यांचे वास्तव्य नागपूरच्या देवी अहल्या मंदिरात होते. त्या काळात त्यांनी अहल्या मंदिरात सेवा प्रकल्प म्हणून वनवासी कन्या छात्रावासात प्रारंभ केला. या छात्राबाबत पूर्वांचलातील सात राज्यांतील ४२ मुली शिक्षण घेत आहेत. राष्ट्रसेविका समितीच्या उत्तर प्रदेशचे काम त्या बघत होत्या. १९९४ ते २००६ पर्यंत त्यांनी समितीच्या प्रमुख संचालिका म्हणून काम बघितले. २००५ मध्ये नागपूरजवळील खाचरी गावात दहा हजार सेविकांचे संमेलन घेतले होते. हे संमेलन नागपूरकरांच्या नेहमीच स्मरणात राहील. उषाताई यांचा आवाज मधुर होता. नागपूर आकाशवाणीवर त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. आणीबाणीच्या काळात उषाताईंचे पती गुणवंत चाटी यांनी सत्याग्रहात भाग घेतला. त्यावेळी संपूर्ण दायित्व त्यांच्यावर आले. उषाताईंनी नागपूर नगर कार्यवाहिका व विदर्भ कार्यवाहिकेची जबाबदारी पार पाडली. १९७० मध्ये अखिल भारतीय गीत प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. १९७५ मध्ये उषाताईंना कारागृहात जावे लागले. उषाताईंनी आणीबाणीविरोधात सत्याग्रह केला. त्यासाठी त्यांना कारावासही भोगावा लागला होता. १९८२ मध्ये पती गुणवंत चाटी यांचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर उषाताईंनी १९८४ मध्ये समितीच्या त्यावेळच्या द्वितीय संचालिका दिवंगत ताई आपटे यांनी त्यांना सहप्रमुख संचालिका केले. आणि मग उषाताईंनी समितीच्या कार्यासाठी देशभर प्रवास केला. १९९४ मध्ये ताई आपटे यांच्या निधनानंतर त्यांच्याच इच्छेनुसार उषाताईंकडे समितीच्या प्रमुख संचालिका पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. राष्ट्रसेविका समितीचे पूर्णवेळ काम करणे सुरू केले. १९९१ मध्ये उषाताई यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेच्या केंद्रीय विश्वस्त पदाची जबाबदारीही सोपविण्यात आली. उषाताईंना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले. त्यात जोशी फाउंडेशनचा राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, स्वामी विवेकानंद पुरस्कार, ओजस्विनी अलंकरन पुरस्कार, भाऊराव देवरस न्यास लखनौनेही त्यांना पुरस्कृत केले. या पुरस्कारांच्या माध्यमातून मिळालेली रोख रक्कम उषाताईंनी संघमित्रा सेवा प्रतिष्ठानला दान केली.

उषाताई यांनी विपरीत परिस्थितीत समितीचे काम केले. मनाचा समतोलपणा ढळू न देता आपल्या आचारविचारांतून प्रेमाचा वर्षाव केला. उषाताईंनी आपल्या स्निग्ध स्वभावाने या सर्व अडचणींवर मात करून सेविकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला. देवी अहल्या मंदिरात उषाताई येणाऱया जाणाऱया प्रत्येक व्यक्तीची जातीने चौकशी करायच्या. अहल्या मंदिरात सतत तेवणारी ज्योत आता शांत झाली आहे. राष्ट्र सेविका समितीचे एक मातृतुल्य व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे.