उत्तराखंडमध्ये भूस्खलन, बद्रिनाथला जाणारे १५ हजार भाविक अडकले

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

उत्तराखंडमधील विष्णूप्रयाग येथे वादळी पाऊस आणि भूस्खलनामुळे बद्रीनाथ हायवेवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. भूस्खलनामुळे रस्ता बंद झाल्याने १५ हजार भाविक अडकून पडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसामुळे शनिवारी दुपारी डोंगर कडा कोसळण्यास सुरुवात झाली.

डोंगरकडा कोसळल्यामुळे  प्रशासनाने बद्रीनाथ हायवेवरील वाहतुक थांबण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे हायवेच्या दोन्ही बाजूला ५०० पेक्षा जास्त लहान-मोठ्या वाहनांची रांग लागली आहे. वाहनांमधील हजारो भाविकांना जोशीमठ, पीपलकोटी, चमोली या भागात थांबवण्यात आले आहे. बद्रीनाथ धाममध्ये १५ हजार, तर अन्य ठिकाणी दहा हजार भाविक अडकल्याची माहिती मिळत आहे.