तीस वर्षांच्या प्रयत्नानंतर मलेरियावर लस मिळाली

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

येत्या 25 एप्रिलला जगभर ‘मलेरिया दिन’ साजरा केला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच आफ्रिका देशाच्या मलावा येथे मंगळवारी जगातील पहिली मलेरिया लस लाँच करण्यात आली. ही लस 5 महिन्यांच्या बालकापासून ते 2 वर्षांपर्यंतच्या मुलापर्यंत देता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ट्विटद्वारे ही माहिती दिली. या लसीमुळे बाळे मलेरियापासून वाचणार आहेत.

डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रो अदनोम घेब्रेयियस यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांत मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न केले. पण काहीच साध्य झाले नाही. पण आता तब्बल 30 वर्षांनंतर आम्ही या रोगावर ही लस बनवली आहे. या लसीमध्ये हजारो मुलांना वाचवण्याची क्षमता आहे. ही लस प्लाज्मोडियम फाल्सीपेरमच्या विरुद्ध काम करते, असे संशोधकांनी पुढे स्पष्ट केले. एकीकडे हिंदुस्थानात मलेरिया या रोगामुळे मुले अगदी कमी वयाची असतानाच दगावतात. हिंदुस्थानात 2016मध्ये मलेरियाच्या दहा लाख 90 हजार 724 प्रकरणांची नोद झाली, तर यातल्या 331 जणांनी याच रोगामुळे प्राण गमावले.