पायाला पानं बांधून शाळेत जायचा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

सामना ऑनलाईन । मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीत अनेक अभिनेते हे सामान्य कुटुंबातून आलेले आहेत. कष्टाने व स्वत:तील कलेमुळे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक नाव आहे अभिनेता वैभव मांगले यांचे. वैभव यांच्या घरची परिस्थिती इतकी हलाखीची होती की त्यांच्याकडे एक जोड चप्पल घ्यायला देखील पैसे नव्हते. त्यामुळे वैभव हे शाळेत जाताना सागाची पानं पायाला बांधून जायचे.

 झी मराठी वाहिनीवरील ‘कानाला खडा’ या कार्यक्रमात वैभव मांगले यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हा किस्सा सांगितला. ‘त्यावेळी आमच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे चप्पल नव्हती. शाळेत जाताना उन्हामुळे पाय खूप भाजायचे. त्यामुळे पायाला चटके लागू नये म्हणून सागाची पानं मी पायाला बांधून जायचो. त्यावेळी पैसे नव्हते त्यामुळे ती परिस्थिती माझ्यावर होती. त्यावेळी फार असं वाटायचं की ही परिस्थिती कुणावर येऊ नये ‘ असे यावेळी वैभव यांनी सांगितले.

vaibhav-mangale

एकेकाळी सागाची पानं पायाला बांधणाऱ्या वैभव यांच्याकडे आता मात्र बूट व चपलांची काहीच कमी नाही. आयुष्यातील त्या घटनेमुळे त्यांचे चपलांबद्दलचे प्रेम अधिक वाढले असून ते बऱ्याचदा बूट व चप्पल खरेदी करत असतात. ‘माझं आणि माझ्या बायकोची अनेकदा या बुटांवरून भांडणं होत असतात. ती नेहमी म्हणत असते अरे बास झाले आता किती घेशील ती बूटं. पण ते कुठेतरी मनात दडलेलं आहे. त्यामुळे त्या गोष्टीबाबत मला फार आसक्ती निर्माण झाली आहे’, असेही यावेळी वैभव यांनी सांगितले.

या कार्यक्रमात वैभव यांच्यासोबत त्यांची बायको, मुलगी व मुलगा देखील सहभागी झाले होते. त्यानंतर वैभव यांनी ‘वौ कौन थी’ या चित्रपटातील ‘लग जा गले’ हे भावनिक गाणे देखील गायले. हे गाणे गाताना वैभव यांना अश्रू आवरले नाहीत. त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ देखील झी मराठीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.