निसर्गाप्रति कृतज्ञता बाळगणे म्हणजेच इश्वराची पूजा – वैभव मांगले

निसर्गाप्रति कृतज्ञता बाळगणे म्हणजेच इश्वराची पूजा… सांगताहेत वैभव मांगले.

> देव म्हणजे? – पूर्वी आपण निसर्गाची पूजा करत होतो. अग्नी, वारा, पाऊस या आपल्यासाठी पूजनीय गोष्टी आहेत. निसर्गाप्रति मी कृतज्ञ आहे. तोच माझ्यासाठी देव.

> आवडते दैवत? – निसर्ग.

> धार्मिक स्थळ? – निसर्गसान्निध्य

> आवडती प्रार्थना – निसर्गाशी संवाद

> आवडते देवाचं गाणं? – पसायदान आवडते.

> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – रामायण, महाभारत थोडं-फार वाचलंय.

> दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का? – एक पक्षी हजारो किलोमीटर प्रवास करतो, हा मला चमत्कार वाटतो, मात्र अंधश्रद्धेने जपलेले दैवी चमत्कार मी मानत नाही. दैवी चमत्कार होतात, तर आज कुपोषणामुळे अनेकजण मरतात त्यांच्यासाठी दैवी चमत्कार का नाही घडत असा माझा हा चमत्कार मानणाऱयांना प्रश्न आहे.

> आवडता रंग? – आकाशी निळा

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – अलीकडे मला व्यायामाचं महत्त्व पटलंय. म्हणून रोज व्यायाम केला तर समाधान मिळतं.

> देवावर किती विश्वास आहे? – माझा निसर्गावर विश्वास आहे.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगाल – श्रद्धा आणि अंधश्रद्धेमध्ये फार धुसर रेषा आहे. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असायला हवा. देवळात जाण्यासाठी पायपिट करायची ही अंधश्रद्धा आहे.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं… तुमचं मत?- आपलं करियर ज्या परीक्षेवर अवलंबून असतं त्यासाठी तुमचा देव पाच नारळांमध्ये कसा तयार होतो, हे कसं शक्य आहे? मेहनतीला परिश्रमांना पर्याय नाही.

> ज्योतिषशास्त्रवर कितपत विश्वास आहे? – ज्योतिषशास्त्र हे माणसाच्या काही अडचणी सोडवण्याचं काम करतं. उदा. तुम्हाला शनीचा प्रकोप आहे आणि पुढचं वर्ष तुमच्यासाठी खूप भयंकर आहे, असं म्हटलं की, माणूस थोडासा विचलीत होतो.

> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? अभिनय ही कला आहे. भूमिकेतलं व्यक्तिमत्त्व मी माझ्यात उतरवत असतो. ती व्यक्तिरेखा मी साकारतो. मी माणूस म्हणून जेवढा संवेदनशील असेन तेवढी माझी कला लोकापर्यंत जास्त पोहोचेल, असे मला वाटते.

> मूर्तीपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – प्रार्थना महत्त्वाची वाटते. त्यात कृतज्ञता भाव असायला हवा. पसायदान ही देवाचे आभार मानणारी प्रार्थना आहे.