वैद्यनाथ बँक रक्कम प्रकरणी पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टरविरूद्ध सीबीआयने दाखल केला गुन्हा

सामना ऑनलाईन। मुंबई आणि संभाजीनगर

परळी येथील वैद्यनाथ सहकारी बँकेच्या मुंबईत सापडलेल्या १० कोटी रूपयांच्या प्रकरणात बँकेच्या कर्मचा-यांसह देशातील प्रख्यात पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉ. सुरेश आडवाणी आणि संभाजीनगर येथील सिग्मा हॉस्पीटलचे संचालक डॉ. उन्मेश टाकळककर यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे.
१९ नोव्हेंबर रोजी मुंबईत टिळकनगर भागामध्ये १० कोटींपेक्षा अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. ही रक्कम मुंबईत आणणाऱ्यांची चौकशी केली असता ती परळी येथील वैद्यनाथ सहकारी बँकेची असल्याचं कळालं होतं. यापैकी काही रक्कम डॉ. सुरेश आडवाणी आणि सिग्मा हॉस्पिटलची असल्याचे चौकशीत समोर आले होते.
काल या प्रकरणात सीबीआयने वैद्यनाथ बँकेच्या पिंपरी चिंचवड, मुंबई आदी ठिकाणी ११ छापे घातले. बँकेच्या दोन व्यवस्थापकांसह डॉ. सुरेश आडवाणी, सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेश टाकळकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात सिग्मा हॉस्पीटलला विचारले असता त्यांनी आमचे वैद्यनाथ बँकेत खाते असून नित्य व्यवहार त्यामार्फतच होतात असे सांगितले. सीबीआयने आमच्याकडे व्हेरिफिकेशन केले असेही हॉस्पिटलने स्पष्ट केले.
राज्याच्या ग्रामीण विकास मंत्री पंकजा मुंडे यांचे बँकेवर वर्चस्व असून भाजपाच्या खासदार प्रीतम मुंडे या बँकेच्या संचालिका आहेत. जेव्हा या बँकेची रक्कम मुंबईत पकडण्यात आली होती तेव्हा त्यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की ही बँकेची रक्कम होती आणि ती एका शाखेतून दुसऱ्या शाखेत नेण्यात येत होती.