संमेलनाचे उद्घाटन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलेच्या हस्ते


पंजाबराव मोरे । यवतमाळ

महेश एलकुंचवार, सुरेश द्वादशीवार तसेच विठ्ठल वाघ यांनी नकार दिल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. साहित्य महामंडळाच्या प्रभारी अध्यक्षा विद्या देवधर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

यवतमाळ येथे 11 जानेवारीपासून मराठी साहित्याचा कुंभमेळा भरत आहे. इंग्रजीच्या प्रसिद्ध साहित्यिका नयनतारा सेहगल यांना या संमेलनाच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्यात आले होते, परंतु संयोजकांनी सहगल यांची भाजप सरकारविरोधाची भूमिका पाहता ऐनवेळी त्यांना येऊ नका असे म्हणत त्यांचे निमंत्रण रद्द केले. संयोजकांच्या या निर्णयामुळे साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली. अनेक साहित्यिकांनी संमेलनाचे आलेले निमंत्रण झुगारून देत संयोजकांवर टीकेची झोड उठवली. त्यातच साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी उपरती झाल्याने राजीनामा दिला. संमेलनाच्या उद्घाटनालाही येण्यास नामवंतांनी नकार दिला. त्यामुळे संमेलनच रद्द होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली.

श्रीपाद जोशी यांचा पदभार विद्या देवधर यांच्याकडे आला. आज झालेल्या बैठकीत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील वैशाली सुधाकर येडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे निश्चित करण्यात आले. खुद्द विद्या देवधर यांनीच पत्रकारांना ही माहिती दिली. नयनतारा सेहगल यांच्या अपमानाचा निषेध करणारा ठराव मांडणार का, असा प्रश्न विचारला असता त्यावर विचार करून निर्णय घेण्यात येईल असे त्या म्हणाल्या. खूप कमी साहित्यिकांनी येणार नाही असे कळवले आहे. परिसंवादाला जे येणार नाहीत त्यांच्याऐवजी दुसऱ्यांना संधी देण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रा. मिलिंद जोशी यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्री येणार की नाहीत
संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि राज्यमंत्री मदन येरावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याच काळात वाराणसी येथे असल्यामुळे संमेलनाच्या उद्घाटनाला येणार नाहीत असे सांगितले, तर विद्या देवधर यांनी मुख्यमंत्र्यांसोबत व्यासपीठावर कोण बसणार याची यादी तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे मुख्यमंत्री येणार की नाहीत यावरून संभ्रम निर्माण झाला आहे.

कोण आहेत वैशाली येडे
वैशाली सुधाकर येडे या यवतमाळच्या कळंब तालुक्यातील राजूर येथील रहिवासी आहेत. सात वर्षांपूर्वी त्यांचे पती सुधाकर यांनी आत्महत्या केली. त्यानंतर तीन मुलांसह त्या संसाराचा गाडा चालवतात. वैशाली या अंगणवाडी सेविका आहेत. श्याम पेटकर लिखित ‘तेरवं’ या नाटकातही त्या काम करतात. महिला बचत गटामध्येही त्यांचा सहभाग आहे. आपल्यावर गुदरलेला प्रसंग इतर कुणावरही येऊ नये म्हणून महिलांना एकत्र करून त्या हे नाटक करतात, अशी माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष डॉ. रमाकांत कोलते, आयोजन समितीचे सदस्य पद्माकर मलकापुरे, घनश्याम दरणे यांनी दिली.