‘वैष्णोदेवी’चा तिसरा मार्ग फेब्रुवारीत सुरू होणार

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा तिसरा मार्ग पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. श्री माता वैष्णोदेवी श्राईन बोर्डाकडून या मार्गाचे काम सुरू असून सध्या तरी वाहतूक करणे शक्य नाही. या रस्त्याचे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करू, असे श्राईन बोर्डाने सुप्रीम कोर्टात सांगितले.

जम्मू येथील माता वैष्णोदेवी मंदिराकडे जाणारा तिसरा मार्ग पादचारी व बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांसाठी २४ नोव्हेंबरपासून खुला करण्यात यावा, असे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिले होते. मात्र श्राईन बोर्डाच्या स्पष्टीकरणानंतर सुप्रीम कोर्टाने एनजीटीच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती एम. बी. लोकूर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. तिसरा मार्ग लवकरात लवकर सुरू करावा या एनजीटीच्या आदेशाविरोधात श्राईन बोर्डाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मार्गाचे काम बाकी असल्याने २४ नोव्हेंबरपासून हा मार्ग सुरू करणे शक्य नसल्याचे बोर्डाने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.

प्रतिदिन ५० हजार भाविकांनाच दर्शन
एनजीटीने दरदिवशी माता वैष्णोदेवीचे दर्शन घेणाऱ्या भाकिकांच्या संख्येवरही नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले आहेत. प्रतिदिन ५० हजार भाकिकांनाच मातेचे दर्शन घेता येईल. फेब्रुवारीमध्ये सुरू होणाऱ्या तिसऱ्या मार्गावर घोड्यांना आणि खेचरांना परवानगी मिळणार नाही. कटारा शहाराजवळून जाणाऱ्या या नव्या मार्गालगत भाविकांनी कचरा केल्यास त्यांना दोन हजारांपर्यंत दंडही ठोठावण्यात येणार आहे.