‘वंदे मातरम्’ : धर्माची ढाल कशासाठी?

>>जयेश राणे<<

हिंदुस्थानने आजपर्यंतवंदे मातरम्म्हणण्याच्या वादावरून कोणाला देशाबाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. त्यामुळे बाहेरच्या रस्त्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच आपले गाठोडे गुंडाळून देशाबाहेरचा रस्ता पकडावा. अर्थात तसे करण्याची हिंमत त्यांच्याकडून केली जाणार नाहीच यात शंका नाही. कारण केवळ सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने करून प्रसिद्धीची हौस भागवली जात आहे. आमच्या समाजाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते असे सांगण्यात अशी मंडळी आघाडीवर असतात. पण असे का होते याचा ते अंतर्मुख होऊन कधीतरी विचार करणार आहेत का?

हिंदुस्थानची ओळख ‘निधर्मी देश’ अशी घडवण्यात आली आहे. असे असताना माझा धर्म मला ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची अनुमती देत नाही असे काही धर्मांध मुस्लिम नेत्यांचे म्हणणे खटकणारे आहे. इतर वेळेस हीच मंडळी निधर्मीपणाची टिमकी वाजवत असतात आणि जेव्हा स्वधर्माचा विषय येतो तेव्हा आमचा धर्म आम्हाला तसे करण्याची अनुमती देत नाही असे सांगून हात वर करतात. जे नेहमीच एकांगी दिसते त्यावर समाज व्यक्त होणारच! आमचा धर्म, तुमचा धर्म असे तू तू मैं मैं करत राहिल्याने देश एकसंध राहण्यात अडचणच येत असते. पण ज्यांना राष्ट्रापेक्षा धर्म मोठा वाटतो, त्यांच्यामुळे सामाजिक वातावरण प्रदूषित होत असते अशा मंडळींकडून धर्माच्या चौकटीतून बाहेर येण्याची शक्यता नाहीच. किंबहुना तशी अपेक्षा ठेवणे म्हणजे अतिशयोक्तीच ठरेल.

 ‘निधर्मी’ हा शब्द देशामध्ये सोयिस्करपणे वापरण्यात येत असतो. हा सोयिस्करपणा मोडीत निघायला पाहिजे. या शब्दाचा दुरुपयोगच देशभर सुरू असल्याची उदाहरणे द्यावी तेवढी अल्पच आहेत. यामुळे देशात सहिष्णुता आणि असहिष्णुता यांवरून वादंग सुरू असतो. कोणी त्याचा राजकीय लाभ उठवण्यासाठी धडपडतो, तर कोणी धर्माच्या आधारे अपलाभ उठवण्यासाठी कंबर कसतो. असे असल्याने देशामध्ये जी काही घटना घडते, वाचाळ प्रतिपादन केले जाते ते सहिष्णुता, असहिष्णुता यांपैकी कोणत्या वर्गामध्ये मोडते हे गेल्या काही वर्षांपासून आवर्जून पाहिले जात आहे. निधर्मीपणा आणि असहिष्णुता यांच्या व्याख्या तरी नेमक्या काय आहेत? अशा संभ्रमात आपला समाज पडला आहे.

‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही असे म्हणणारी मंडळी केवळ संधीच्या शोधात असतात हे त्यांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आत्यंतिक पोटतिडकीने ‘आम्ही कसे योग्य आहोत’ हे सांगण्याचा आटापिटा सुरू असतो. यांना ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही तर मग ते काय म्हणणार आहेत हे त्यांनी सांगायला पाहिजे. जी गोष्ट म्हणणार नाही ती सांगण्यासाठी कंठ फुटतो तर मग त्याऐवजी काय म्हणणार हे सांगा.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी हसतहसत बलिदान दिले. त्यांच्या शौर्यगाथा आजही चर्चिल्या जात आहेत आणि जातील. कारण त्यांनी राष्ट्रासाठी जो त्याग केला आहे त्याला तोड नाही. आपल्या धाडसी कारवायांनी इंग्रजांची झोप उडवणारे महान क्रांतिकारक कुठे तर मानेवर सुरी ठेवली तरी ‘वंदे मातरम्’ म्हणणार नाही असे म्हणणारे धर्मांध लोकप्रतिनिधी कुठे. खरे म्हणजे राष्ट्र प्रथम आणि धर्म नंतर यायला हवा. कारण राष्ट्र टिकले तरच धर्म टिकणार आहे. ‘वंदे मातरम्’ या गीतातून राष्ट्रसेवा करण्यासाठी प्रेरणा मिळते. म्हणूनच तर असंख्य युवा स्वातंत्र्यपूर्व काळात घरावर तुळशीपत्र ठेवून राष्ट्रसेवा करण्यासाठी तयार झाले. अशा निःस्वार्थी मंडळींच्या अतुल्य योगदानातूनच हिंदुस्थान स्वतंत्र झाला. आपल्या समाजातील नागरिकांना राष्ट्रासाठी झिजण्यास ती मंडळी सांगतील का?

संविधान, कायदे यांचा आम्ही आदर करतो असे यांच्याकडून सांगितले जाते, पण त्यांचे किती टक्के पालन केले जाते? हे कोण सांगणार? देशवासीय मात्र याविषयी अचूक लेखाजोगा बाळगून आहेत. वाद नको म्हणून तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून आहेत. दुसरीकडे आपली वेगळी ओळख कशी टिकून राहील यासाठी उथळपणा करणारे नेतृत्व मिळाल्याने मुस्लिम समाज देशाच्या मुख्य प्रवाहाशी अद्याप जोडला गेलेला नाही.

हिंदुस्थानने आजपर्यंत ‘वंदे मातरम्’ म्हणण्याच्या वादावरून कोणाला देशाबाहेरचा रस्ता दाखवलेला नाही. त्यामुळे बाहेरच्या रस्त्याची भाषा करणाऱ्यांनी स्वतःच आपले गाठोडे गुंडाळून देशाबाहेरचा रस्ता पकडावा. अर्थात तसे करण्याची हिंमत त्यांच्याकडून केली जाणार नाहीच यात शंका नाही. कारण केवळ वाचाळपणा करण्यापर्यंतच यांची धाव असते हे सर्वश्रुत आहे. मात्र ही मंडळी देशाबाहेर गेल्यावर देशामध्ये पसरवले जाणारे वैचारिक प्रदूषण कमी होणार आहे. सुंठीवाचून खोकला जात असेल तर उत्तम आहे! अशा मंडळींनी देशाबाहेर जाणेच योग्य. सवंग लोकप्रियतेसाठी अशी विधाने करून प्रसिद्धीची हौस भागवली जात आहे. आमच्या समाजाकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते असे सांगण्यात अशी मंडळी आघाडीवर असतात. पण असे का होते याचा ते अंतर्मुख होऊन कधीतरी विचार करणार आहेत का? तो होत नसल्याने मुस्लिम समाजाविषयीच विनाकारण संशयाचे धुके अधिक गडद होत जाते. अर्थात ‘वंदे मातरम्’ गाऊन सच्च्या मुस्लिमांनीच याबाबतीत पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणजे संशयाचे धुके कमी होईल.