वाराणसीत मंदिर तोडल्यानेच पूल पडला – राज बब्बर

सामना ऑनलाईन । वाराणसी

वाराणीसमध्ये मंगळवारी निर्माणाधीन पूल पडल्याने १५ लोकांचा मृत्यू झाला तर ५० जण जखमी झाले.  हा पूल निर्माण करण्यासाठी मंदिर तोडल्यानेच हा अपघात झाला असा दावा उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी केला आहे. बब्बर यांनी बुधवारी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर स्थानिक लोकांच्या हवाल्याने आपण हे वक्तव्य करत असल्याचे बब्बर यांनी सांगितले.

या पुलाचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी या भागात तीन विनायक मंदिर होते ही मंदिर पाडण्यात आली अशी माहिती स्थानिकांनी दिल्याचे राज बब्बर यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.

या अपघाताला अधिकाऱ्यांइतकेच मंत्रीही जबाबदार असून त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी बब्बर यांनी केली. मृतांच्या नातेवाईकांनी सरकारने दिलेली पाच लाखांची मदत अपुरी असून त्यांना ५० लाखांची मदत देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर बब्बर यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली.  ‘ पंतप्रधानांच्या मतदारसंघात मोठी दुर्घटना घडूनही मोदी दुसरिकडे जल्लोष साजरा करत होते, असे बब्बर यांनी सांगितले.