वाराणसीत विद्यार्थिनींचं छेडछाडीविरोधात आंदोलन, पंतप्रधान दुर्गापूजेत व्यग्र

सामना ऑनलाईन । मुंबई

पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसीत सध्या गुंडाराज सुरू असल्याचं चित्र आहे. एकीकडे बनारस हिंदु विश्वविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी रोज होणाऱ्या छेडछाडीला कंटाळून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून दुसरीकडे त्यांना भेट न देता पंतप्रधान मात्र दुर्गापूजा आणि काशीतील मंदिरांना भेटी देत असल्याचं समोर आलं आहे.

बनारस विद्यापीठात शिकणाऱ्या आणि विद्यापीठ परिसरातल्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज छेडछाडीला सामोरं जावं लागतं. गुरुवारीही अशाच एका घटनेवरून विद्यार्थिनींचा संताप अनावर झाला आणि शेकडोंच्या संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी या छेडछाडीविरोधात आंदोलनाला बसल्या. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी यांच्या वाराणसी दौऱ्यादरम्यानच हे आंदोलन सुरू होतं. त्यामुळे विद्यापीठ परिसरात काही काळ वाहतूक कोंडी होती. या कोंडीमुळे पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफाही दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आला. त्यामुळे पंतप्रधान काशी आणि दुर्गाकुंडावर पूजेसाठी गेले, मात्र विद्यापीठाच्या परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केल्याचं समोर आलं आहे.

गुरूवारी २१ सप्टेंबर रोजी बनारस विद्यापीठाच्या बाहेर तीन तरुणांनी एका तरुणीचा तिची छेड काढत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी विद्यापीठाची विद्यार्थिनी असून परिसरातील हॉस्टेलवर राहते. आपल्यासोबत घडलेल्या घटनेची तक्रार पीडितेने वॉर्डनकडे केली. मात्र, वॉर्डनने तिची तक्रार न नोंदवता उलट तिलाच प्रश्न विचारायला सुरुवात केली.

त्यानंतर त्या पीडितेने हॉस्टेलवरील तिच्या सहकाऱ्यांना ही घटना सांगितली. ते ऐकून सर्वच विद्यार्थिनींनी विद्यापीठाबाहेर आंदोलन करायचा निर्णय घेतला. वारंवार होणाऱ्या छेडछाडीला रोखावं आणि विद्यापीठ परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं अशी या विद्यार्थिनींची मागणी आहे. त्यांनी त्यांची मागणी एका पत्राद्वारे विद्यापीठाला सुपूर्द केली आहे. या पत्रानुसार, विद्यापीठ आणि हॉस्टेल परिसरात राहणाऱ्या विद्यार्थिनींना दररोज अशा घटनांना सामोरं जावं लागतं. हॉस्टेलचा मार्ग सुरक्षित नसून तिथे मुलांचा खूप त्रास होतो. अनेक तरुण हॉस्टेल बाहेर येऊन हस्तमैथुनासारखे अश्लील चाळे करतात. आक्षेपार्ह भाषा वापरत तिथून ये-जा करतात, दगड मारतात. अशा घटनांमुळे कित्येक विद्यार्थिनी शिक्षण सोडून निघून गेल्या आहेत.