तपोवन, जनशताब्दीला मुकुंदवाडीत मिळेना थांबा

3

सामना ऑनलाईन । संभाजीनगर

मुकुंदवाडी स्टेशनला डी दर्जा प्राप्त होऊन एक वर्ष झाले असतानादेखील दमरेचे अधिकारी त्या दर्जानुसार सुविधा पुरविण्यास टाळाटाळ करून त्यांच्याच नियमांची पायमल्ली करीत आहेत. या स्टेशनवर तपोवन, जनशताब्दीसह एक्स्प्रेस रेल्वे थांबणे बंधनकारक असतानादेखील त्या एक्स्प्रेस थांबविण्यास प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या संभाजीनगर रेल्वेस्टेशनवर जवळपास ६६ एक्स्प्रेस आणि पॅसेंजर गाड्या ये-जा करीत असतात. या स्टेशनच्या उत्पन्नामध्ये मोठी वाढ होत असते. संभाजीनगरला देश – विदेशातून पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे उत्पन्नामध्ये झापट्याने वाढ होते. संभाजीनगर आणि चिकलठाणादरम्यान मोठ्या प्रमाणात नागरी वसाहत झाल्यामुळे नांदेड विभागाने मुकुंदवाडीला हॉल्ट स्टेशन सुरू केले. हॉल्ट स्टेशनवरील तिकीट खिडकी कंत्राटपद्धतीने सुरू करण्यात आली, या तिकीट खिडकीवरून अपेक्षापेक्षा अधिक तिकीट विक्री होऊ लागल्यामुळे रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडकीचे कंत्राट रद्द करून तिकीट खिडकी स्वत: चालवू लागले. मुकुंदवाडी, जयभवानीनगर, राजनगर, लक्ष्मीनगर, पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर परिसर, गारखेडा परिसर, सिडको, एन-४, कामगार चौक, सिडको, एन-१, एन-२ यासह सिडको- हडको, हर्सूल आणि चिकलठाणा गाव या भागात सात ते नऊ लाख लोकांना हे रेल्वे स्टेशन सोयीस्कर आहे.

रेल्वेच्या नियमानुसार मुकुंदवाडी स्टेशनवर चार तिकीट खिडक्या, पाण्यासाठी वॉटर कुलर, वेटिंग हॉल यासह सर्व एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वे थांबविणे आवश्यक आहे. मात्र दक्षिण मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी या नियमांची पायमल्ली करीत दुर्लक्ष करत आहेत. या स्टेशनवर एक्स्प्रेस रेल्वे थांबविण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा करीत पाठपुरावा केली. मात्र रेल्वे प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे.

सध्या लग्नसराईबरोबरच आता शाळेला सुट्या लागणार आहेत. सुट्यांमध्ये सहल, गावाला जाणाऱ्यांची संख्या वाढते. त्यामुळे रेल्वेप्रशासनाने मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनवर १ मे ते ३१ जुलैदरम्यान प्रयोगिक तत्त्वावर देवगिरी, नंदीग्राम, तपोवन आणि जनशताब्दी एक्स्प्रेसला थांबा द्यावा. त्याचबरोबर नरसापूर -नगरसोल आणि जनशाताब्दी एक्स्प्रेसला थांबा द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मराठवाडा रेल्वे विकास समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांनी दमरेचे महाप्रबंधक आणि नांदेडच्या डीआरएम यांना निवेदनाद्वारे दिला.

आपली प्रतिक्रिया द्या