देव माझा

>>प्रतिनिधी<<

संगीत शिक्षिका, अभिनेत्री वर्षा दांदळे सांगताहेत त्यांच्या मनातला देव.

> देव म्हणजे? – माझ्यातली सद्सदविवेकबुद्धी

> आवडते दैवत? – गणपती बाप्पा

> धार्मिक स्थळ? – अक्कलकोट, शेगावचा गजानन महाराजांचा मठ

> आवडती प्रार्थना – हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे…आणि पसायदान

> आवडतं देवाचं गाणं? – तुकारामांचे अभंग, माऊलींचे अभंग, आणि मोगरा फुलला…

> धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का? – धार्मिक ग्रंथावर आधारित असलेलं ललित साहित्य वाचायला आवडतं.

> आवडता रंग? – पांढरा

> अशी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं? – मुलांना शिकवलेलं गाणं त्यांच्या आवाजात ऐकलं की बरं वाटतं. अभिनेत्री म्हणून भूमिका करत असताना आपसुकच काही हावभाव सुचतात तेव्हा मज्जा वाटते आणि समाधान मिळतं.

> देवावर किती विश्वास आहे? – नामस्मरणावर विश्वास आहे, कुठल्याही देवळाबाहेर रांग लावण्यापेक्षा.

> दुःखी असतेस तेव्हा? – एखादी गोष्ट सोडवणं माझ्या हाती नसेल तर दुःखी होऊन काय फायदा. नसेल ते माझं. म्हणून देवावर सोडून देते. नामस्मरण करते. नकारात्मकता कमी होते.

> नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील? – नास्तिक लोकांचा स्वतःच्या कर्तृवावर खूप विश्वास असतो. सर्वसामान्य लोक देवावर सोपवून मोकळी होतात. त्यांच्यासारखी लोकं स्वतःच स्वतःची देव बनतात. आपण निसर्गाचा भाग आहोत. देवाने आपल्याला जन्माला घातलंय. म्हणून व्यवस्थित जगून आपलं देहकार्य संपवणं. यासारखी मोठी पूजा कोणती? नास्तिकांकडे प्रचंड मोठा आत्मसन्मान आहे.

> देवभक्त असावं पण देवभोळं नसावं…तुमचं मत काय?

– स्वतःची विचारशक्ती देवभोळं असण्याने नष्ट होते. कर्म करत भक्तियोग करा, १३व्या शतकातच हा विचार मांडला गेलाय. आपण आज २१व्या शतकात मंदिरांसमोर रांगा लावून वेळ वाया घालवतो. संतांनीही काम करीतच भक्ती केली आहे.

> इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का? – अजिबात नाही. अतिमहत्त्वाकांक्षा, अति पुढे जाण्याची हाव यामुळे नवस करावेसे वाटतात. अस्वस्थता वाढल्यामुळे आधाराची गरज लागते. आधार कोणाचा तर देवाचा म्हणून नवस केले जातात.

> अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता? – अभिनयाची उंची गाठण्यासाठी चांगले सिनेमे बघते, चांगल्या अभिनेत्यांच्या मुलाखती वाचते. माझ्यासाठी अभिनयाची ही भक्ती आहे. सिनेमा बघताना शॉर्ट कसा घेतला, अभिनय कसा होता, इत्यादी दृष्टिकोनांचा विचार करते.

> मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना00? – एकाग्रतेसाठी मूर्तीची गरज असते. नामस्मरण आवडतं म्हणून प्रार्थना महत्त्वाची वाटते.