बाहुबलीवरून कॉपी केले कलंकचे पोस्टर

सामना ऑनलाईन । मुंबई

सध्या जोरदार चर्चा असलेल्या ‘कलंक’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर आज रिलीज करण्यात आले. मात्र हे पोस्टर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना बाहुबलीतील भल्लालदेवची आठवण झाली आहे. वरुण देव हा अगदी डिट्टो भल्लालदेव सारखा दिसत आहे. वरुणने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून हे पोस्टर रिलीज केले आहे. त्यानंतर काहींनी हे पोस्टर बाहुबलीची कॉपी असल्याचे सांगत वरूणला ट्रोल केले आहे.

बाहुबली या चित्रपटात ‘भल्लालदेव’ हा बिथरलेल्या वळूसोबतचा लढतानाचा एक सिन आहे. त्या सारखाच वरुण देव देखील एका वळूसोबत लढताना या पोस्टरमध्ये दिसत आहे. वरूणचा पेहराव, त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव हे भल्लाल देव सारखेच असल्याने नेटकऱ्यांनी देखील हे पोस्टर पाहून बाहुबलीची आठवण झाल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात कलंक या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर या चित्रपटाचा भव्य दिव्य टिझरही प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात माधुरी दिक्षित, संजय दत्त, वरुण धवन, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा व आदित्य रॉय कपूर हे मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट येत्या 17 एप्रिलला रिलीज होणार आहे.