वसंत नरहर फेणे

>> प्रशांत गौतम

मराठी साहित्यातील कथा, कादंबरी हा वाङ्मयप्रकार आपल्या सशक्त लेखणीने समृद्ध करणारे ज्येष्ठ लेखक वसंत नरहर फेणे गेले. मराठी वाङ्मयात साठोत्तरीचा हा कालखंड आणि त्या कालखंडातील लेखक हा एक महत्त्वाचा पैलू आहे. फेणे त्या काळातील महत्त्वाचे लेखक होत. सुमारे पाच-सहा दशकं त्यांनी मराठी साहित्य सकस लेखनाने समृद्ध केले. कथालेखक ही त्यांची महत्त्वाची ओळख आहेच; पण त्याच सोबत फेणे यांनी नाटक, एकांकिका, विनोदी लेखन, अनुवाद, कविता अशा साहित्य प्रकारातूनही मुशाफिरी केलेली आहे. प्रारंभीच्या काळात त्यांनी काही कविता लिहिल्या आणि त्या ‘सत्यकथे’स पाठवल्या. पहिली कविता प्रसिद्ध झाली. मात्र त्यानंतरच्या बहुतेक कविता साभार परत आल्या. त्यामुळे काव्यलेखनाच्या प्रवासास स्वल्पविराम मिळाला. फेणे यांनी कथा-कादंबऱयांमधून माणूस हा केंद्रबिंदू ठेवून साहित्य निर्मिती केली. सभोवतालच्या अफाट विश्वाचे अवलोकन करीत असताना त्यांनी माणसामाणसांमधील परस्पर नातेसंबंधांचा वेध घेतला.

वसंत नरहर फेणे यांचा जन्म १९२७ साली मुंबईतील जोगेश्वरी परिसरात झाला. चार वर्षांचे असतानाच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यानंतर त्यांच्यासह भावंडांना घेऊन आई कारवारला गेली. तिथल्या मराठी शाळेत वसंतरावांचे मराठी प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर ते मोठ्य़ा भावासोबत सातारा येथे आले आणि वर्षभरातच पुन्हा कारवारला परतले. काही वर्षांनंतर मुंबईत आले आणि त्यांचा शैक्षणिक प्रवास सुरू झाला. फेणे हे संवेदनशील होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्र सेवादलाशी स्वतःला जोडून घेतले. कौटुंबिक कारणांमुळे त्यांची सतत वणवण झाली आणि विविध नोकऱयांच्या निमित्ताने पुणे, विजापूर, नाशिक असा बराच प्रवासही झाला आणि तोच त्यांच्या साहित्यात परावर्तित होत गेला. भटकंतीच्या काळात त्यांच्यातील लेखक हा सजग होता. एवढेच नव्हे तर या समृद्ध अनुभवविश्वातूनच एक प्रगल्भ लेखकही घडत होता. वसंत नरहर फेणे आणि दिवाळी अंक यांचा स्नेह फार आधीपासूनचा. विपुल लेखनाने ‘दिवाळी अंकासाठी लेखन करणारे महत्त्वाचे लेखक’ अशी त्यांना एक ओळख मिळत गेली. एकूणच वाङ्मयप्रकारातून फेणे यांनी सर्वसामान्य माणसांचे प्रत्ययकारी चित्रण केले. वयाच्या पस्तीशीतच ते कथालेखनाकडे वळले. दिवाळी अंकातील वैविध्यपूर्ण लेखनाने त्यांनी वाचकांचे लक्ष वेधून घेतले होते. हीच वाचकप्रियता त्यांना उत्तरोत्तर लाभत गेली. अगदी वयाची नव्वदी पार करेपर्यंत फेणे वाचन, लेखनात सतत व्यस्त असायचे. १९७२च्या सुमारास त्यांचा ‘काना आणि मात्रा’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला आणि त्यावर राज्य पुरस्काराची मुद्राही उमटली. १९७८ मध्ये वयाची पन्नाशी ओलांडल्यावर फेणे यांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली व पूर्णवेळ लेखन-वाचनास वाहून घेतले.

पन्नास-साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात साठ कथासंग्रह, दहा कादंबऱयांची सकस आणि दर्जेदार निर्मिती केली. ‘ज्याचा त्याचा क्रूस, निर्वासित नाती, पाणसावाल्यांची वसाहत, मावळतीचे मृद्गंध’ या महत्त्वाच्या कथासंग्रहांचा उल्लेख करावा लागेल. ‘सेन्ट्रल बस स्टेशन’, ‘विश्वंभरे बोलविले’ या कादंबऱया महत्त्वाच्या आहेत. त्यांची ‘कारवारची माती’ ही प्रदीर्घ कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली होती. प्रस्तुत कादंबरीत फेणे यांची प्रत्ययकारी भाषाशैली, सूक्ष्म निरीक्षण, राजकीय-सामाजिक प्रक्रियांची नेमकी उमज आणि माणसामधील नातेसंबंधांचा घेतलेला वेध या गुणविशेषामुळे त्यांचे लेखन हे वाचकांच्या हृदयात स्थान मिळवणारे होते. फेणे यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील शरद बुक गॅलरीच्या वतीने एकूणच लेखन योगदानासाठी भाऊ पाध्ये स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले होते. या निमित्ताने एका व्रतस्थ लेखकाचा सन्मान झाला. फेणे यांच्या निधनाने सशक्त ताकदीचा व्रतस्थ कथा-कादंबरीकार आपल्यातून गेला आहे.