वसंतराव आपटे

102

भगवान परळीकर

वसंत गणेश आपटे यांच्या निधनाने शेतक-यांचा लढवय्या आणि सच्चा नेता काळाच्या पडद्याआड गेला. सधन घरात जन्मलेल्या वसंतरावांची राहणी शेवटपर्यंत साधी आणि विचारसरणी उच्च राहिली. लहानपणी त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झाले होते. सोलापूर शहरातील मधला मारुती भागात सराफ बाजारातील गणेश रामचंद्र आपटे ही वडिलोपार्जित सुवर्णपेढी चालविण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवटच सोडावे लागले. गेल्या चार पिढय़ांपासून आपटे कुटुंबीय या व्यवसायात आहेत. मात्र वसंतराव आपटे यांनी व्यवसाय सांभाळून शेतकऱयांच्या हितासाठी आयुष्यभर लढा दिला. भाई एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, रंगा वैद्य आदी नेत्यांच्या सहवासात त्यांची जडणघडण झाली. १९७७ मध्ये आणीबाणीनंतर जनता पक्षाची स्थापना झाली तेंव्हा स्व. आप्पासाहेब काडादी, स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर यांच्यासमवेत त्यांनी जनता पक्षाचे काम केले. ऐन विशीत ते चळवळीत सामील झाले. समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. साने गुरुजींचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. चळवळीत असतानाच शेतकरी संघटनेचे संस्थापक डॉ. शरद जोशी यांच्या ते संपर्कात आले. १९८०च्या काळात शरद जोशी यांनी शेतकरी संघटना सुरू केली तेंव्हापासून वसंतराव आपटे हे पहिल्या फळीचे नेते होते. सत्ता आणि पदाची त्यांना कसलीच लालूच नसल्याने ते कायम साधनविहीन माणसांच्या शोषणाविरुद्ध आवाज बुलंद करीत राहिले. कष्टकरी शेतकऱयांबद्दल त्यांच्या मनात कायम कळवळा होता. आंबेठाण येथून कोणत्याही आंदोलनाची हाक दिली तर ते सोलापुरात रस्त्यावर उतरून आंदोलन करीत. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी जिल्हा. शरद जोशी यांचे आंदोलन कापूस, कांदा असे पीककेंद्री होते. सोलापूर जिल्हय़ात ज्वारीचे उत्पादन अधिक आहे. त्यामुळे वसंतराव आपटे यांच्या आग्रहामुळे आंबेजोगाई येथे ज्वारी परिषदही घेण्यात आली. उत्पादित कृषिमालाचा किमान भाव ठरवताना कोरडवाहू पिकांचा समावेश केला जावा यासाठी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला. चळवळ हा त्यांचा पिंड होता. त्यांना शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्षही होता आले असते, पण ते अशा पदावरून दूर राहिले आणि संघटना देईल ती जबाबदारी निष्ठsने पार पाडत राहिले. सार्वजनिक जीवनात बाबा म्हणून लोकप्रिय असलेल्या वसंतराव आपटे यांनी सहकार्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालकपदावर काम करत असतानाही त्यांनी शेतकऱयांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथे नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या सहकार्याने गावकऱयांसाठी दूध संस्था सुरू केली. अंत्रोळीच्या विकासासाठी वसंतराव आपटे यांनी अनेक योजना राबवून गावचा चेहरामोहरच बदलून टाकला. स्वातंत्र्यसेनानी अंत्रोळीकर दुग्धव्यवसाय संस्थेची स्थापना करून त्यांनी अंत्रोळीत ‘घरटी एक गाय’ योजना राबविली. गोरगरीब शेतकऱयांना आर्थिक आधार दिला. या संस्थेच्या माध्यमातून स्वतः धान्य दुकान, सुपर बाजार, माध्यमिक शाळा चालविल्या जातात. सलग ३८ वर्षे अंत्रोळी ग्रामपंचायतीची निवडणूक अविरोध करून वसंतराव आपटे यांनी आगळावेगळा आदर्श निर्माण केला. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे नव्हते. मात्र राजकीय पक्षावर त्यांचा दबाव कायम होता. हजारे यांनी पुकारलेल्या आंदोलनाची सोलापूर जिल्हय़ाची धुरा वसंतराव आपटे यांच्याकडे होती. याशिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचेही त्यांनी काम केले. वसंतरावांनी ४० वर्षांपूर्वी शर्टाला शेतकरी संघटनेचा बिल्ला लावला होता. त्यावेळच्या शेतकरी आंदोलनात १६ शेतकऱयांचा बळी गेला होता. त्यांची आठवण म्हणून संघटनेचा लाल बिल्ला वसंतरावांनी आपल्या छातीवर लावला आणि आयुष्यभर अभिमानाने मिरवला. मृत्यूनंतरही त्यांच्या शर्टला तो बिल्ला होता. जीवनभर त्यांनी हा बिल्ला जपला आणि त्यांच्यासमवेतच तो पंचत्वात विलीन झाला.

आपली प्रतिक्रिया द्या