उत्तर प्रदेशात ‘वास्को द गामा’ एक्स्प्रेसचे १३ डब्बे घसरले; ३ जण ठार, १० जखमी

सामना ऑनलाईन । लखनौ

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वे अपघातांचे सत्र सुरूच असून आज पहाटे चित्रकूटमधील माणिकपूर येथे ‘वास्को द गामा हून पाटण्याला जाणाऱ्या एक्स्प्रेसला अपघात झाला आहे. ट्रेनचे १३ डब्बे रुळावरून घसरले. या दुर्घटनेत ३ प्रवाशांचा मृत्यू झाला, तर १० हून अधिक जण जखमी झाले आहेत. त्यापैकी ७ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू करण्यात आलं असल्याची माहिती डी.एम. शिवाकांत यांनी दिली आहे.

रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार ही एक्सप्रेस माणिकपूर स्टेशनवरून सकाळी ४.१८च्या सुमारास निघाली. स्टेशनवरून काही अंतरावर पोहचताच ट्रेनचे १३ डब्बे रुळावरून घसरले. रेल्वे रूळाला तडे गेल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज उत्तर प्रदेशच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी वर्तवला आहे. तर दुसरीकडे ट्रेन चालकानं अचानक ब्रेक दाबल्यामुळे अपघात झाल्याचीही चर्चा आहे. अपघातानंतर पाटणा-गोवा रेल्वे मार्गावरील रेल्वेचं वेळापत्रकही बदलण्यात आलं आहे. अपघातानंतर तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आलं असून डॉक्टर्सची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी या अपघातावर दु:ख व्यक्त करत अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे.