दक्षिणेला दरवाजा म्हणून घर नाकारताय? मग हे वाचा

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष, वास्तुशास्त्र विशारद)

वास्तु संदर्भातील टिप्स मी गेल्या बऱ्याच लेखांत दिलेल्या आहेत. वाचकांना त्या टिप्सचा फायदा होत असल्याचे त्यांनी फोनवरून किंवा ई-मेलद्वारे कळवले आहे. आजच्या लेखात वास्तु संदर्भातील काही गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आहे. वास्तूबाबत जनसामान्यांच्या मनात गैरसमज असतात. त्यांत पहिला क्रमांक आहे –

दिशेचा गोंधळ – :

वास्तू संदर्भात प्रश्न विचारल्यानंतर सर्वजण -“माझी वास्तू पूर्व -पश्चिम आहे”- हे सांगतात. आता पूर्व -पश्चिम वास्तू म्हणजे त्यांच्या मते परफेक्ट वास्तू. पूर्वेला मुख्य दरवाजा आहे म्हणजे वास्तूच्या नियमांच्या चौकटीत आपली वास्तू आहे हा एक मोठा गैरसमज लोकांचा असतो. मुख्य दरवाजाची दिशा म्हणजे वास्तूबद्दल फक्त १५% माहिती. बाकी वास्तूत असणाऱ्या बाकी गोष्टींनाही तितकेच महत्त्व आहे. ही गोष्ट त्यांच्या ध्यानीमनीही नसते. दिशेबाबत अजून एक गोष्ट म्हणजे लोकांच्या मनातील दिशेच्या बाबतीत असणारा संभ्रम. माझ्या घराचा मुख्य दरवाजा पश्चिम दिशेचा असे ठामपणे सांगणाऱ्या व्यक्तींच्या घरी वास्तू परीक्षणासाठी मी गेले असता दरवाजा हमखास पूर्व दिशेचा असल्याचे समजते. ह्यासाठी दिशेचे अज्ञान कारणीभूत ठरते. कारण लोकांचा समज असा आहे की, दारातून आत जातांना समोर जी दिशा येते ती आपल्या मुख्य दाराची दिशा. ह्या बाबत मुख्यतः दोन गोष्टी इथे स्पष्ट करते – :

१) वास्तूचे मुख्य द्वार कुठल्या दिशेत आहे हे पहायचे असल्यास एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे, मुख्य दरवाजातून बाहेरच्या दिशेस पाहिल्यास जी दिशा येते त्या दिशेत तुमचे मुख्य दरवाजा येतो. उदाहरणार्थ – दारात उभे राहून जर बाहेरच्या बाजूस पश्चिम दिशा येत असेल तर तुमचा दरवाजा पश्चिम दिशेचा आहे हे समजून जा.

२) पूर्व -पश्चिम दिशेचा दरवाजा उत्तम असतो हा गैरसमज आहे. तुमच्या कुंडलीप्रमाणे त्याचे शुभत्व ठरते. त्यामुळे पूर्व -पश्चिम म्हणजे उत्तम आणि दक्षिण दिशेचा दरवाजा वाईट हा समज काढून टाका. तुमच्या दशेप्रमाणे आणि कुंडलीप्रमाणे वास्तूचे द्वार शुभ की अशुभ हे ठरवता येते.

दक्षिणेस मुख्यद्वार असू नये? -:

घर निवडतांना बरेचजण पूर्व-पश्चिम दार असलेल्या घरालाच प्राधान्य देताना आढळतात. दक्षिण दिशेस दार असल्येल्या घरांना कोणीही वाली नाही. ठाण्यात जेंव्हा एका ठिकाणी मी वास्तू परीक्षणेसाठी गेले असता त्या tower (१५ मजली tower ) मधील दक्षिण दिशेला मुख्य दार असलेले एकही घर कित्येक वर्ष विकले जात नव्हते.
हा असलेला समज अंशतः चुकीचा आहे. जशी प्रत्येक व्यक्ती वेगळी,तिचा स्वभाव वेगळा तसेच प्रत्येक वास्तू वेगळी आणि त्याची उर्जा वेगळी. प्रत्येक व्यक्तीसाठी एखादी वास्तू,त्या वास्तूची उर्जा इतकी अनुकूल ठरते की त्याच घरात त्या व्यक्तीची किंबहुना त्या कुटुंबाची भरभराट होते. किंवा मग काही वेळेस लोक अशी तक्रार करतात मी तर घर पूर्व-पश्चिम दरवाजा पाहूनच निवडले होते मग माझी अधोगती का झाली? हे वास्तू वगैरेचे मग तुमचे नियम इथे खोटे ठरतात. अशा वेळेस खरे तर मला त्यांची कीव येते. जसे समजा एखादे औषध आपण ताप आल्यावर घेतो. साधारण ताप असेल तर त्या औषधाने बरे वाटेल. परंतु ताप हा मलेरिया किंवा डेंग्यूचा असेल तर फक्त नेहेमीचे औषध घेऊन चालणार नाही. लक्षणे बदलली की औषधं बदलतात. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्ती भिन्न असते,त्या व्यक्तीच्या व्यवसाय इतर लोकांपेक्षा वेगळा असतो. त्याचप्रमाणे त्याच्या कुंडलीप्रमाणे वास्तु, वास्तुचे मुख्य दार कुठे असणे अनुकूल? हे ठरवणे महत्वाचे आहे. तेंव्हा दक्षिण दिशेचा दरवाजा नेहेमीच वाईट नाही.

घराच्या बाजूस असलेले स्मशान/दफनभूमी -:

दिशेनंतर घराच्या आजूबाजूच्या परिसरात काय आहे ह्या गोष्टींना महत्त्व आहे. हल्ली घराच्या बाजूला हॉस्पिटल आणि शाळा आहे ना ह्या गोष्टीला फारच प्राधान्य आहे. शाळेपर्यंत ठीक आहे परंतु सर्वजण आपण काही काळानंतर आजारीच पडणार आहोत हे गृहितच धरून चाललेले आहेत असं वाटतं. घराच्या बाजूला हॉस्पिटल असावेच आणि स्मशान किंवा दफनभूमी असू नये हे अगदी ठाम असते. ह्याबाबतही माझे मत असे आहे – पूर्वीच्या काळात स्मशान हे गावाच्या बाहेर नदीकाठी असायचे. म्हणजे अगदी दूर,नजरेआड. परंतु सध्या मुंबई आणि त्याच्या आसपासच्या परिसरात इतकी लोकसंख्या वाढली आहे की बऱ्याच सोसायटी स्मशानाच्या अगदी बाजूला असतात. काही व्यक्तींना स्मशानाच्या आसपास आपले घर असणे खूप negative वाटू शकते आणि काहींना त्यात काहीच तथ्य नसल्याचे मत असू शकते. स्मशानाच्या आसपास आपली वास्तु असू नये ह्याचे एकमेव शास्त्रीय कारण म्हणजे आपल्या हिंदु धर्म शास्त्राप्रमाणे अंत्यविधी म्हणजे त्या व्यक्तीने पंचतत्त्वात विलीन होऊन जाणे. आणि त्यासाठी अग्नि संस्कार सूचित केलेला आहे. हा संस्कार जेंव्हा एखाद्या व्यक्तीवर स्मशानात केला जातो त्यामुळे होणारा धूर,प्रदुषण हे आसपासच्या वातावरणात पसरतो. सध्या तर बरेच असाध्य असे रोग असलेले लोक आसपास आपण पाहतो. जर अशा व्यक्तीला अंत्यसंस्कारच्या वेळेस दिलेल्या अग्नीमूळे हवेत पसरणारे प्रदूषण तुमच्या घरात येत असेल तर घरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी कदाचित घातक ठरू शकेल. आणि ह्याच कारणासाठी आपल्या पूर्वजांनी स्माशान हे गावाबाहेर असण्याची सोय सांगितलेली आहे. एकवेळेस दफनभूमी वास्तूच्या आसपास असणे चालू शकेल परंतु शक्यतो स्मशानाच्या आसपास वास्तू न घेतलेली बरी. आणि स्मशानाच्या आसपास तुमचे घर असेल तर त्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे तुम्ही घरच्या घरी करू शकता. ते उपाय तुम्ही वास्तू तज्ज्ञांना विचारू शकता त्यामुळे घाबरण्याची गरज नाही.

घराच्या समोर मंदिर -:

हे एक नवीन फॅड आलेले आहे. हल्ली ९०% सोसायटीच्या परिसरातच मोठे मंदिर असते. सोयीचे वाटत असले तरी ते वास्तूच्या नियमांविरुद्ध आहे. ह्यासाठीही मी पुन्हा तुम्हाला आपल्या शास्त्राचेच संदर्भ देईन. पूर्वी बांधलेली बहुतांश मंदिरे ही उंच डोंगरमाथ्यावर बांधली गेली आहेत. उदा. केदारनाथ,गिरनारचे दत्त मंदिर, वैष्णव देवी मंदिर. ही सगळी मंदिरे अगदी उंच ठिकाणी बांधण्यात आली. असे का ? असा प्रश्न तुमच्याही मनात बरयाच वेळेस आला असेल परंतु त्याचे उत्तर ? त्याचे उत्तर असे आहे की संसारात गढून गेलेल्या लोकांनी त्यांच्या आयुष्यातला काही वेळ हा ह्या संसारापासून दूर जाऊन मनः शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी व्यतीत करावा. मंदिरात हजारो लोक नामस्मरण,देवाचा जयघोष करत असतात त्यामुळे मंदिरात एक वेगळे वातावरण तयार होत असते. प्रत्येक मंदिराची एक उर्जा असते. ही उर्जा आणि तयार झालेले वातावरण हे मंदिराच्यावर असणाऱ्या घुमटात साठून रहाते आणि आणि मंदिराच्यावरती जो कळस असतो त्यातून हा ऊर्जा स्रोत आजूबाजूच्या परिसरात घुमतो. जर हा कळस तुमच्या खिडकीच्या किंवा मुख्य दाराच्या समोर येत असेल तर त्या उर्जेचा स्त्रोत सतत तुमच्या घरी प्रवाहित होतो. ही उर्जा अत्यंत ताकदीची असते. जर सतत तुमच्या घरी हा स्त्रोत प्रवाहित होत असेल तर शास्त्राप्रमाणे तुमच्यासाठी ही वास्तु रहाण्यायोग्य नाही. परंतु आज देव इतका स्वस्त झाला आहे की लोकांना अगदी त्यांच्या घरासमोर मंदिर हवे आहे. घरच्या आसपास अगदी छोटे मंदिर असणे ठीक आहे परंतु घरासमोर/खिडकीसमोर मोठे मंदिर असणे,घरातून मंदिराचा कळस दिसणे, घरात मंदिराच्या घंटांचा आवाज घुमणे हे वास्तूशास्त्राच्या नियमांविरुद्ध ठरते. त्यामुळे घराच्या आसपास मंदिर असू नये.

वास्तु संदर्भातले मला सतत विचारण्यात येणारे समज-गैरसमज मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला आजचा हे लेख नक्की ज्ञानोपयोगी ठरेल अशी आशा करते. वास्तु निवडताना तुम्ही ह्यां सर्व गोष्टी लक्षात ठेवालचं त्याच बरोबरीने हे ही ध्यानात असू दे प्रत्येक वास्तु चांगलीच असते. ती आपण फुलवायची असते. अशी प्रसन्न वास्तु आनंद देत रहाते.

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. [email protected]