वास्तूचे आरोग्य टिकवण्याचे सोपे उपाय

anupriya-desai-astrologer>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुशास्त्र विषारद)

 

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या वास्तूच्या लेखानंतर बऱ्याच वाचकांची ई-पत्रे आली. काहींनी लेख आवडल्याबद्दल सांगितले आणि काहींनी वास्तूबद्दल अजून काही टिप्स देण्याबद्दल विनंती केली. आजच्या लेखात वास्तूतील ऊर्जा सकारात्मक कशी ठेवता येईल ह्याबद्दल माहिती देत आहे. सोपे उपाय देण्याचा प्रयत्न आहे. वाचकांना ही माहिती नक्की उपयुक्त ठरेल अशी अशा आहे.

वास्तू हा शब्द “वस” म्हणजेच वसणे /रहाणे ह्या शब्दावर आधारित आहे. ज्या ठिकाणी आपण वसणार / रहाणार त्या जागेला वास्तू म्हटले जाते. गेल्या लेखांत मी उल्लेख केलाच होता की आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक नवीन वास्तूची पूजा केली जाते. एवढेच नसून आपल्या आयुष्यात पदार्पण करणाऱ्या नवीन व्यक्तीचे सुद्धा औक्षण केले जाते.  कारण आपल्या संस्कृतीत प्रत्येक वास्तूत दैवत्व आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे हे शिकविले जाते. पुस्तक स्वरूपात देवी सरस्वतीची, पैसे,दागिने ह्या स्वरूपात लक्ष्मीची, बल/ शक्ती स्वरूपात मारुतीची पूजा केली जाते. त्यामुळे ज्या वास्तूत आपण रहातो त्या वास्तूची पूजा किंवा रिचार्जिंग करणे आवश्यक आहे हे गेल्या एका लेखात सांगितलेच परंतु त्याच प्रमाणे वास्तूचे आरोग्य संभाळणेही तेवढेच महत्त्वाचे ठरते.

मुळात  वास्तूचे आरोग्य हा प्रकार काय आहे ते समजून घ्या. वास्तूशास्त्र म्हणजे वास्तूतील पंचतत्वांचे संतुलन. अग्नि,पृथ्वी,वायू,जल आणि आकाश.  ही पाचही तत्वे वास्तूच्या प्रत्येक दिशेत आहेत. वास्तूचे आरोग्य जर जपायचे असेल अग्नितत्व हे आग्नेय दिशेत,जलतत्व ईशान्य दिशेत,वायूतत्व वायव्य दिशेत, पृथ्वीतत्व नैऋत्य दिशेत आणि आकाशतत्व हे वास्तूच्या मध्यभागी येते.  ह्या तत्वांमधील संतुलन बिघडले की वास्तूचे आरोग्य बिघडते. ह्या तत्वांचे संतुलन बिघडणे म्हणेज कुठल्याही एका तत्वाची कमतरता असणे.

ह्या दिशेतील कमतरता भरून काढण्यासाठी काही शास्त्रीय उपाय आहेत. परंतु ते उपाय वास्तूतज्ञ व्यक्तीकडूनच करून घेणे उत्तम. स्वतःच स्वतःचा डॉक्टर होऊ नये. परंतु काही सोपे उपाय असे आहेत जे केल्याने वास्तूतील मरगळ निघून वास्तूतील प्रसन्नता वाढते. खालील उपाय आपण करून बघू शकता –

१) वास्तूतील फरशी खडे मिठाने दररोज पुसून घेणे. दररोज न जमल्यास आठवड्यातून तीन वेळेस तरी स्वच्छ करून घ्यावी. खडे मिठाने नकारात्मक ऊर्जा वास्तूतून निघून जाण्यास मदत होते.

२) मुंबई,ठाणे आणि आजूबाजूच्या खाडीच्या आसपास असणाऱ्या जिल्ह्यांना त्रास आहे तो डासांचा. डासांचा आणि माश्यांचा उपद्रव पावसाळ्यात अधिक वाढतो. आधीच्या काळी जमिनी गायीच्या शेणाने सरावल्या जायच्या त्यामुळे डांस,कीटक,माशा ह्यांना घरात थारा नसायचा.  हल्ली फ्लॅट सिस्टिममध्ये हायटेक लाद्यांना कुठे आले गायीच्या शेणाचे आवरण ? मग डासांना घालवण्यासाठी खिडक्या बंद करून उकाडा सहन करा किंवा केमिकल्सने बनलेल्या गुडनाईट किंवा तत्सम गोष्टींचा वापर करा. त्यापेक्षा एक सोपा उपाय आहे. हल्ली गायीच्या शेणाच्या गोवऱ्या बाजारात उपलब्ध आहेत.  लहानसे होमकुंड घेऊन त्यात एक शेणाची गोवरी जाळून त्यात एक कापूरवडी,एक समिधा,एक चमचा गायीचे तूप,धूप,एक चमचा गायीचे दूध ह्याची आहुती देऊ शकतो. ह्यामुळे घर निर्जंतुक रहाण्यास मदत होते.

३) वरील उपाय नाही जमला तरी कापूर रोज प्रज्वलित केल्याने सुद्धा घरातील वातावरण शुद्ध रहाण्यास मदत होईल.

४) गोमूत्र, आंबे हळदीची पावडर ह्यांचे मिश्रणाचे छोटे गोळे बनवून घरातील कोपऱ्यात ठेवू शकाल. नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यास मदत तर होईलच आणि पेस्ट कंट्रोलचीही गरज भासणार नाही.

५) एका ग्लासभर पाणी घेऊन त्यात निलगिरी तेलाचे ५-६ थेंब, २-३ कापूरवडीची (भीमसेनी कापूर वापरू शकाल. भीमसेनी कापूर बाजारात उपलब्ध असतो. ) पावडर, खडे मिठाचे २ खडे विरघळवून  हे पाणी घरभर “स्प्रे” बॉटलने स्प्रे करून घेणे. ह्यांने पावसाळ्यात होणारा माश्यांचा त्रास होत नाही आणि वास्तूत सकारात्मक ऊर्जा प्रवाहीत होण्यास मदत होईल.

६) संध्याकाळच्या वेळेस मोबाईलवर रामरक्षा किंवा हनुमान चालीसा साधारण अर्धातास तरी सुरु ठेवावी. रामरकक्षेतील काही स्वरांमुळे तुमच्या सप्त चक्रांवर ध्वनी निर्माण होऊन त्याचा तुमच्या आरोग्यसाठी उपयोग होऊ शकतो.

७) घरातील टॉयलेट्समध्ये चिनीमातीच्या किंवा मातीच्या वाडग्यात खडे मीठ ठेवावे. (प्लॅस्टिक किंवा काचेच्या भांड्यात अजिबात नाही ) हे मीठ दर पंधरा दिवसांनी बदलून नवीन मीठ ठेवावे.

८) वास्तू -परिक्षणाला जेंव्हा मी जाते तेंव्हा असे लक्षात येते की मुख्यद्वारावर दिवाळीत किंवा दसऱ्याला लावलेले आंब्याच्या पानांचे तोरण पूर्णतः सुकून गेलेले असते. आपण आपले घर तर स्वच्छ ठेवतो परंतु दारावर सुकून गेलेले हे तोरण काढून टाकण्यास पूर्णतः विसरून जातो. तेंव्हा मंडळी तुमच्या दारावर जर दिवाळीचे तोरण अजून असेल तर लवकरात लवकर ते काढून टाका.

९) मुख्यप्रवेशद्वार हे नेहेमी स्वच्छ असावे.  प्रवेशद्वारासमोर रांगोळी असावी असे आपली संस्कृती सांगते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात हे शक्य नाही तरी सुद्धा रांगोळीने ( स्टिकर्स नव्हेत )छोटेसे स्वस्तिक काढावे. स्वस्तिक ह्या चिन्हाला खूप महत्त्व आहे. (नाझी सैन्याचे चिन्ह उलटे स्वस्तिक होते )  स्वस्तिक चिन्हावर कधीतरी विस्ताराने लिहीन.

१०) वास्तूत जास्तीत जास्त उजेड येईल हे पहावे. काहीवेळेस मी असे पाहिले आहे की दिवसभर पडदे लावून ठेवण्यात येतात. घरात उजेड असल्याने वास्तू निर्जंतुक रहाण्यास मदत होते.

ह्यातील जमतील तेवढे उपाय करू शकता किंवा ह्यापैकी एखादा उपाय करू शकता. ह्यात अपायकारक किंवा अशास्त्रीय असे काहीही सांगितलेले नाही.

वास्तुशास्त्राच्या अजून काही टिप्स हव्या असल्यास नक्की कळवा.

हे उपाय नक्की करून पहा.

आपल्या प्रतिक्रियांचे आम्ही स्वागत करतो, आपल्या प्रतिक्रिया या ब्लॉगच्या खाली लिहू शकता किंवा पुढील ई-मेलवर लिहून कळवा.  [email protected]