व्यवसायाच्या भरभराटीसाठीचं वास्तुशास्त्र

anupriya-desai-astrologer>>अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुविशारद)
वास्तुशास्त्र हा शब्द ऐकला आपण असेल. व्यवसायातील वास्तुशास्त्र हा नवीनच कन्सेप्ट आहे असे तुम्हांला वाटेल, परंतु असे नाही. व्यवसायातील वास्तुशास्त्र म्हणजे तुमच्या व्यवसायातील वास्तुशास्त्र. तुम्ही ज्या ठिकाणी व्यवसाय करता त्या ठिकाणी साधारणपणे २४ तासांपैकी १४ ते १५ तास असता. तुमची स्वतःची ऊर्जा आणि त्या वास्तूची ऊर्जा ह्याचा जर मेळ बसला तर व्यवसाय नुसता चालणारच नाही तर धावायला लागेल. परंतु ह्यासाठी सल्ला देणाऱ्या वास्तुतज्ज्ञांचा वास्तुशास्त्राचा ऍडव्हान्स अभ्यास झालेला हवा.

ईशान्य ही दिशा सर्वसाधारणपणे पवित्र मानली गेली आहे. ईशान्य म्हणजे “ईश” तत्वाची दिशा. दक्षिण दिशा कायम वाईट मानली गेली आहे. माझे सर्व जातकांना नेहेमी हेच सांगणे असते की कुठलीही दिशा चांगली किंवा वाईट अजिबात नसते. प्रत्येक दिशा ही प्रत्येक माणसाच्या कुंडलीप्रमाणे, स्वभावाप्रमाणे,व्यवसायप्रमाणे चांगली किंवा वाईट ठरते. त्यामुळे मनुष्याचा स्वभाव कसा आहे? कुंडलीतील ग्रह काय म्हणतात? व्यवसाय कोणत्या स्वरूपाचा आहे? हे अभ्यासूनच जातकाला सल्ला देणं उचित ठरेल.

उदाहरणार्थ – ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे लोकांमधील सौंदर्य खुलवण्याचा. शैक्षणिक क्लासेसचा व्यवसाय आहे विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचा. दोन्ही व्यवसाय वेगळ्या पद्धतीचे आहेत. दोन्ही व्यवसायांतील गिऱ्हाईकांची अपेक्षा वेगळी आहे. दोन्ही व्यवसायांत होणारे व्यावसायिक फायदे वेगळे आहे. दोन्ही व्यवसायांचे स्वरूप वेगळे आहे. मुंबईत एका छोट्याशा ब्युटी पार्लर चालवणाऱ्या माझ्या मैत्रिणीला मी पार्लरची एक जागा निवडून दिली ज्या जागेचे प्रवेशद्वार दक्षिण-पश्चिम दिशेला येत होते. त्यानंतर तिचा व्यवसायाचा विस्तार एवढा वाढला की तिला ब्युटी पार्लरच्या तीन शाखा काढल्या. ब्युटी पार्लरचे कोर्सेस तिने सुरू केले ते ही तुफान सुरू आहेत.

व्यक्ती तितक्या प्रकृती ह्या उक्तीप्रमाणे जितके व्यवसाय आहेत त्याप्रमाणे वास्तुशास्त्राच्या नियमांत थोडाफार बदल करणे फायदेशीर ठरेल. बँक, हॉस्पिटल, कॉर्पोरेट ऑफिस, औषधांची कंपनी,सिमेंट कंपनी इ. प्रत्येकाचे स्वरूप वेगळे आहे. त्यामुळे नियम बदलत राहणार. बँकेची वास्तुशास्त्राप्रमाणे रचना करायची झाल्यास बँकेचे प्रवेशद्वार, मॅनेजरची केबिन, लॉकररूम, स्टोर रूम, रोजची बँकेत येणाऱ्या लोकांची बसायची जागा, टॉयलेट्स ह्या सर्व गोष्टींचा विचार व्हावा लागतो, अशीच रचना जर एखाद्या क्लासेसची वास्तुशास्त्राप्रमाणे सांगड घालायची झाल्यास विद्यार्थ्यांचे चेहरे पूर्व दिशेत येतील अशी बेंचेसची आणि बोर्डची रचना असावी. रिसेप्शनिस्टच्या बसण्याची जागा ही दक्षिण दिशेत असावी. मुख्य शिक्षकाची केबिन दक्षिण-पश्चिम दिशेत असेल तर बरे.

मला तरी असे वाटते की वास्तूचा अभ्यास होण्याआधी किंवा व्यक्तिला वास्तूसंदर्भात सल्ला देण्याआधी त्या व्यक्तिची मानसिकता काय आहे? कुंडलीतील कुठल्या ग्रहांची साथ आहे? कुठले ग्रह दगा देणार आहेत? सध्या कुठल्या दशा सुरू आहेत? त्याची स्वतःची तो व्यवसाय सांभाळण्याची ताकद आहे का? की धरसोडवृत्ती आहे? ह्याच व्यवसायांत यश आहे का? हे कुंडलीवरून तपासून झाल्यावरच वास्तुकडे वळावे. नुसतेच वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तु घेतली म्हणजे व्यवसाय यशाची उंची गाठत नाही. वास्तुशास्त्र आणि व्यक्तिच्या कुंडलीचा सखोल अभ्यास आणि त्याचे स्वतःचे प्रयत्न याचा मेळ बसल्यास व्यक्तिला यश गाठणे कठीण नाही.

पूर्व दिशा नेहेमीच चांगली नाही आणि दक्षिण ही नेहेमीच वाईट दिशा नाही. प्रत्येक दिशा आणि वास्तु ह्यांचे तुमच्या स्वभावाशी ताळमेळ छान बसला पाहिजे. वकिली करणाऱ्या व्यक्तिंना दक्षिण ही दिशा भाग्योदयकारक ठरते. इथे पुन्हा एकदा माझा प्रयत्न जनसामान्यांच्या मनातील एक गैरसमज दूर करण्याचा आहे. दक्षिण दिशा अमुक व्यक्तिसाठी चांगली असे म्हटले की लोक दक्षिण दिशेचे प्रवेशद्वार असलेली वास्तू शोधतात. शब्दशः तसा अर्थ नसून दक्षिण दिशा ज्यांना भाग्योदयकारक आहे अशा व्यावसायिकांनी वास्तुचे नुसतेच प्रवेशद्वार दक्षिणेत असलेली वास्तु न घेता दक्षिणेत खिडक्या असलेली वास्तुही तुम्हांला लाभदायी ठरेल. हाच नियम इन्कम टॅक्स ऑफिसर ह्यांना लागू पडतो. त्यामुळे बरेचसे जातक मला नेहेमी प्रश्न विचारतात-दक्षिणेत दरवाजा वाईट ना पण आमची तर इथे भरभराट झाली. मग त्यांच्या व्यवसायसंदर्भात चौकशी केल्यास उत्तर सापडते. असे हे शास्त्र.

व्यवसायात सर्वसाधारण वास्तुशास्त्राचा कसा उपयोग करता येईल ह्यासाठी काही टिप्स इथे देत आहे. पुढच्यावेळी ह्यां विषयावर सविस्तर असे लिहीन. –

१) व्यावसायिकाने स्वतः नैऋत्य दिशेत बसावे. त्याची केबिन ह्याच दिशेत असावी. त्याचा चेहरा उत्तर दिशेकडे येईल अशी रचना असावी. बीमखाली बसू नये.

२) जो तयार झालेला माल विकला जावा अशी इच्छा आहे तो माल वास्तूच्या वायव्य दिशेत ठेवावा.

३) कामगार लोकांना उत्तर दिशेत बसता येईल अशी रचना करावी.

४) तिजोरी किंवा पैसे ठेवण्याची जागा दक्षिण दिशेत असावी.

५) व्यावसायिकाला मिळालेली मानचिन्हं -पारितोषिकं दक्षिण दिशेत असावीत.

६) मार्केटिंग विभागाची रचना व्यवसायाप्रमाणे ठरते. त्याबद्दल वास्तु तज्ज्ञांकडून सल्ला घेणे.

ह्या सर्वांपेक्षा महत्वाच्या बाबी म्हणजे, ऑफिसमध्ये उजेड पुरेपूर असावा. बेसमेंटमध्ये ऑफिस असल्यास भरपूर उजेड राहील अशी लाईट्सची रचना असावी. ऑफिसमध्ये प्रेरणादायी quotes असावेत ज्यामुळे तिथे काम करणाऱ्या इतर व्यक्तिंनाही काम करण्याचा उत्साह वाटत राहील.

ह्या लेखाच्या शेवटी मी एवढेच म्हणेन की व्यवसाय करणे आणि तो यशस्वी करून दाखवणे ह्यांत अंतर आहे. तुमच्या मेहनतीचा सहभाग हा ८०% असावा आणि नंतर वास्तुशास्त्रातील नियम पाळावेत. स्वतःवर विश्वास असणे जास्त महत्वाचे. आत्मविश्वास आणि भाग्य ज्याने बाळगले त्याला व्यवसायातील यशाची उंची नक्कीच गाठता येईल.

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. [email protected]