वटपौर्णिमेचं शास्त्रीय महत्त्व

14

anupriya-desai-astrologerवटपौर्णिमाजवळ आली आहे, महिला वर्ग आणि वटपौर्णिमेवरून चुटके घेणारे जोक्स सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. गम्मत म्हणून हे सुरूच राहणार पण वटपौर्णिमेला केवळ पारंपारिक महत्व नसून त्यामागचा शास्त्रीय दृष्टीकोन समजून घेणं आणि तो इतरांपर्यंत पोहोचवणं आपलं कर्तव्य आहे. तेव्हा गम्मत-जम्मत म्हणून जोक्स शेअर करता, तसंच त्या मागची शास्त्रीय भूमिका मांडणारा हा ब्लॉगही शेअर करा…

>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तू विशारद)

ह्या वर्षी आठ जूनला वटपौर्णिमा आहे. सकाळपासूनच वडाभोवती सवाष्णींचा घोळका दिसेल. जीन्स -पंजाबी सुटातल्या रोजच्या सवाष्णी जेंव्हा ह्या दिवशी साडी नेसून,ठसठशीत दिसून येणारे मंगळसूत्र आणि नथ घालून वडाभोवती प्रदक्षिणा घालतात तेंव्हा आपली संस्कृती अजूनही ह्या निमित्ताने जपली जातेय हे कळते. ह्या दिवशी वडाची पूजा केल्याने नवऱ्याचे आयुष्य वाढते असा एक समज आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी सत्यवान आणि सावित्री ह्यांची एक कथा सांगितली जाते. काहीजणींना ही कथा भावते म्हणून त्या ह्या दिवशी वडाची पूजा करतात,काही जणींना घरातून पूजा करण्याचे सांगितले जाते म्हणून त्या पूजा करतात. आणि अजून ह्यातला एक प्रकार म्हणजे “वडाची” पूजा करून नवऱ्याचे कसे काय आयुष्य वाढेल?? सात जन्म हाच पती ?? नको ग बाई !!!काहीतरीच !!!. आमचा नाही विश्वास ह्या थोतांडावर. आम्ही उपवासही करणार नाही आणि पूजाही करणार नाही. असा उघड विरोध करून पूजा न करणारी एक कॅटेगरी.

कथेत किती सत्यता आहे किंवा नाही हे तर आपण पडताळून पाहू शकत नाही परंतु आपल्या पूर्वजांनी ह्या दिवशी वडाचीच पूजा करण्यास का बरें सांगितले हे नक्कीच तपासून पाहू शकतो. वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा. ज्येष्ठ महिना हा उन्हाळा संपून पावसाळ्याकडे वाटचाल करणारा महिना. ह्या महिन्यांत वातावरणात एक बदल येऊ पहात असतो. ह्या बदलात हवेत धूळ,प्रदूषण वाढलेले असते. वारा प्रचंड वेगाने वाहत असतो. वाऱ्याची वावटळं ह्या काळात सुरूच असतात. पावसाळ्यानंतर हे प्रदूषण पावसाच्या पाण्याने विरून जाते किंवा आजच्या भाषेत “SET” होते म्हणू. ह्या सगळ्या काळात ऑक्सिजनची सर्वात जास्त गरज प्रत्येकालाच असते. परंतु घरातील एका व्यक्तीवर घराची,ऑफिसची,मुलांची सर्वात जास्त जवाबदारी असते आणि ती व्यक्ती म्हणजे घरातील स्त्री. स्त्रीला आधीपासूनच जास्त जवाबदारी आहे (सध्याचा काळ त्याला अपवाद ठरतोय. सध्या नवरोजीसुद्धा घरातील सर्व कामांत आपला हातभार लावत आहेत.) आधी शेतीची कामे, घरातील स्वयंपाक,पाहुण्याची ऊठबस, मुलांचे पालनपोषण, घरातील गायी,म्हशी ह्यांची काळजी घेणे ह्यातच स्त्रियांचा वेळ व्यतीत होत होता. आत्ताचा काळही ह्या मेहनतीला अपवाद नाही. आजच्या स्त्रीला शेतीची कामे नसली तरी उच्च शिक्षित असल्याने मोठ्या पदावर सध्या त्या काम करीत आहेत. ह्या स्पर्धेच्या युगात स्वतःला रोज सिद्ध करावं लागतंय. घरी आल्यावर आराम असा नाहीच,कामावरचा थकवा विसरून घरी मुलांचा अभ्यास आणि प्रोजेक्ट्स ह्यात आजची स्त्री गढून जाते. शनिवार आणि रविवार हे दिवस बाकीच्या छोट्या-मोठ्या कामात भुर्रकन उडून जातात. म्हणजेच आजच्या स्त्रीलाही फार उसंत नसते. मग ह्या धावपळीच्या रोजच्या दिनक्रमात तिच्या शरीराला आणि मेंदूलाही जास्तीत जास्त प्राणवायूची गरज भासते. मग हा प्राणवायू मिळवायचा कुठून ? ह्याचेच उत्तर आपल्या सर्व रूढी – परंपरेत लपलेले आहे असे मला वाटते.

हा विचार तुमच्यापुढे अधिक प्रभावशाली पद्धतीने मांडण्यासाठी आपण वडाच्या झाडाचे महत्त्व समजून घेऊ. वडाच्या झाडाला अक्षयवृक्षही म्हणतात. अक्षय्य म्हणजेच ज्याचा क्षय होत नाही असे. वटवृक्षाचा कधीही क्षय होत नाही. ते कायम वाढतच राहते. वडाच्या पारंब्या जमिनीतून पुन्हा पुन्हा जन्म घेऊन वडाचा विस्तार वाढत जातो. वडाच्या झाडाचे आयुष्य हजारो वर्ष असते. वडाच्या फुलाचे,कोंबाचे,डहाळीचे,पानांचे फायदे आहेत. त्याने मनुष्याच्या आरोग्याला फायदा होतो. तो कसा ते पाहू :-

१) वडाचे झाड एका तासाला साधारणपणे सातशेबारा किलो ह्या प्रमाणात “ऑक्सिजन” वातावरणात सोडत असते.
२) भरपूर पाने असल्यामुळे विषारी वायू शोषला जाऊन हवा शुद्ध ठेवण्याचे काम वडाचे झाड करते.
३) वड उन्हाळ्यात दिवसाला २ टन इतके पाणी, बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असतात.
४) वडाच्या झाडामध्ये ढगातून पाऊस खेचून आणण्याची ताकद आहे असे म्हंटले जाते. जिथे वडाची झाडे जास्त तिथे पाऊस चांगला पडतो.
५) वडाचा आयुर्वेदिक उपचारासाठीही उपयोग होतो. वडाच्या पारंब्यांच्या रसाने केशवर्धन होते. पारंब्यांच्या काढा शक्तिवर्धक,बुद्धिवर्धक आहे.
६) गर्भधारणा होण्यासाठी आणि गर्भधारणा झाल्यानंतर वडाचा आयुर्वेद शास्त्राप्रमाणे औषधोपचार करता येतो.
७) गर्भधारणा झाल्यानंतर आधीच्या काळी बाळ सुदृढ असावे ह्यासाठी ठराविक नक्षत्रावर “पुसंवन”हा विधी केला जायचा. वडाच्या कोवळ्या कोंबाला गायीच्या कच्च्या दुधात वाटून ठरावीक नक्षत्रावर, ठरावीक नासिकेत त्याचा रस आयुर्वेदाचार्यांकडून घेतला जायचा.
८) वडाच्या सालीचा काढा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत समस्येत उपयोगी ठरतो.
९) वड हा मुळात शीत असल्याने पित्तावर गुणकारी आहे.
१०) उन्हाळ्यात त्वचाविकारांचा प्रादुर्भाव असतो. तेंव्हा वडाच्या झाडाच्या चिकाचा उपयोग होतो.
११) यकृताच्या समस्यांवर वडाच्या झाडाचे आयुर्वेदात महत्त्व सांगितले आहे.

म्हणजेच वडाच्या शीतकारी गुणधर्मामुळे उन्हाळ्यात सर्वांसाठी उपयोगी असा हा वटवृक्ष. स्त्रियांच्या सर्व समस्येत वडाच्या पानांचा,पारंब्यांचा,कोंबाचा उपयोग होतो. उन्हाळ्यात जास्तीत जास्त पाणी बाष्प स्वरूपात वातावरणात सोडत असल्याने उन्हाळ्यात वडाच्या सानिध्यात राहिल्याने तुम्हांला उन्हाळ्याचा त्रास होऊ शकत नाही. सतत प्राणवायू सोडत असल्याने उन्हाळ्यात ह्याच्या सान्निध्यात रहावे असाच संदेश आपल्या पूर्वजांना आपल्याला द्यायचा आहे. परंतु आधीच्या काळी सर्वसामान्य मंडळी ऋषीमुनींवर असलेल्या विश्वासामुळे “Scientific Analysis” च्या भानगडीत न पडता ऋषीमुनींनी सांगितल्याप्रमाणे वडाची पूजा एक धार्मिक विधी म्हणून करीत होते. वडाच्या पारावर पुरुषमंडळीतर दिवसभराच्या गप्पागोष्टी करण्यासाठी भेटत असत. स्त्रिया दररोज सकाळी वडाला प्रदक्षिणा मारीत असत. त्यामुळे ह्या ना त्या कारणाने मंडळी वटपौर्णिमेव्यतिरिक्त वडाच्या म्हणजेच अक्षयवृक्षाच्या सान्निध्यात येत होती. त्यामुळे त्यांची शरीरेही सुदृढ होती आणि मनही. आज आपण प्रत्येक गोष्टीचं इतकं analysis करतो परंतु तरीही शरीर सुदृढ नाही.

तेंव्हा मंडळी वडाच्या सान्निध्यात जितकं रहाता येईल तितके रहा. स्त्रियांना तर मी विशेष विनंती करेन की ह्या वटपौर्णिमेला सात जन्म हाच पती मिळावा अशी इच्छा धरून वडाची पूजा करावी की नाही ही सर्वस्वी तुमची इच्छा परंतु वटपौर्णिमेव्यतिरिक्त सुद्धा वडाच्या सान्निध्यात राहिल्यास तब्येतीच्या दृष्टीने चांगले राहील. आणि हो अजून एक छोटीशी विनंती :-

गेले अनेक वर्ष मी पहातेय नोकरी करणाऱ्या स्त्रिया प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा वेळेअभावी करता येणे शक्य नसल्याने वडाची एक डहाळी बाजारातून घेऊन येतात आणि त्याची पूजा करतात किंवा मग वडाच्या झाडाचे चित्र काढून त्याची पूजा करतात. आजच्या “मॉडर्न” स्त्रिया मोबाईलवरच्या वडाच्या चित्राची पूजा करतात. हे सर्व “भावना” जपण्यासाठी ठीक आहे परंतु त्यामुळे ऋषीमुनींना अभिप्रेत असलेला मूळ उद्देश हरवत चालला आहे. एका डहाळीकडून किंवा वडाच्या झाडाच्या चित्राकडून तुम्हांला “ऑक्सिजन” मिळणार आहे का ? ह्याचा विचार व्हावा.

वर दिलेली सर्व माहिती ही मला नेटवरून उपलब्ध झालेली आहे. त्यात मला असलेलेही थोडीबहुत माहिती त्यात जमा करून ती माहिती तुमच्या पर्यंत पोहोचावी आणि तुमचा दृष्टिकोन बदलावा एवढीच इच्छा. आपल्या सर्व सणावारांना धार्मिक स्वरूप जरी असले तरी त्यात खूप चांगला शास्त्रीय दृष्टिकोन अभिप्रेत आहे. तो शोधून तुमच्यापर्यंत आणण्याचा हा छोटासा प्रयत्न.

कसा वाटला हा लेख ? प्रतिक्रिया जरूर कळवा – [email protected]

संपर्कसाठी मोबाईल क्रमांक- ९८१९०२१११९ (फक्त संध्याकाळी ६ ते ८ यावेळातच फोन करणे)

एक प्रतिक्रिया

  1. pure non-scientific article under the name of Science. There was no pollution before 300 years. There was lot of greenery, and trees around all homes just 50 years back. Oxygen level never gets lower in natural environment. Oxygen levels drop only in closed premises with toxic gases.

    Banyan Tree may be useful for health, but the logic presented in here is totally crap. When you want to connect rituals to ancient practices then also one should understand the living conditions at that time. Filling up words without no logic doesn’t make up a scientific article.