वायू वादळाचा 500 गावांना बसणार फटका, अडीच लाख लोकांचे स्थलांतर

64

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘वायू’ चक्रीवादळ तब्बल 180 किमी प्रती तास वेगाने गुजरातच्या दिशेने जात आहे. या वादळाचा गुजरात किनारपट्टीवरील 500 गावांना फटका बसणार आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाने या गावांतील तब्बल अडीच लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. गुजरात किनारपट्टीवरील विविध भागात दहा हजार पर्यटक अडकले होते त्या सर्वांना देखील सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.

13 जूनला दुपारी गुजरातच्या किनारपट्टीवर ‘वायू’ चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकी 45 जवानांचा समावेश असलेली राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन दलाची (एनडीआरएफ) 26 पथके गुजरातच्या किनारपट्टी भागात तैनात करण्यात आली आहेत. गुजरात सरकारच्या विनंतीवरून आणखी दहा पथके पाठवली गेली आहेत. या व्यतिरिक्त 14 एसआरपीच्या तुकड्या तसेच 300 मरीन कमांडो तैनात करण्यात आले आहेत.

तटरक्षक दल, नौदल आणि लष्कराची युनिटस्ही संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारे वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात आले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या