व्हेज बिर्याणी

साहित्य : (बिर्याणी मसाल्यासाठी) १ चमचा जिरे, २-३ स्टारफूल, साधारण चमचाभर दगडफूल, ४-५ लवंगा, काळीमिरी,  जायपत्री, दालचिनी १ तुकडा, १ मसाला वेलची, २ हिरवी वेलची आणि दोन तमालपत्रे.

(बिर्याणीकरिता) तमालपत्र, जावेत्री, चक्रीफूल किंवा स्टारफूल, २ हिरवी वेलची, थोडी दालचिनी, १ चमचा जिरे, १ चमचा काळीमिरी, ३-४ लवंगा, गाजराचे तुकडे, श्रावणी घेवडा, १ बटाटा साली काढून मोठे तुकडे करून, पनीरचे तुकडे, पाव कप मटार, फ्लॉवरचे तुकडे, दही अर्धा कप, बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिन्याची पाने, लाल तिखट, धणेपूड, १ चमचा बिर्याणी मसाला, १ चमचा आलं लसूण पेस्ट, चिरलेला कांदा, पाव कप तळलेला कांदा, चिरलेला टोमॅटो मीठ, दीड कप तांदूळ, साजूक तूप, थोडसं केशर. 

कृती : सर्वप्रथम बिर्याणी मसाल्यासाठी सर्व साहित्य बारीक करावे. थोडसं जाडसर वाटावं. त्यानंतर भाज्या मॅरिनेट करण्यासाठी एक भांड्यात दही घ्यावे. त्यामध्ये लाल तिखट, धणेपूड, आलं-लसूण पेस्ट आणि मीठ घालावं. त्यामध्ये १ चमचा बिर्याणी मसाला घालावा. त्यामध्ये पुदिन्याची पाने घालावीत. त्यासोबत चिरलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत हे पुन्हा एकदा मिसळून घ्यावेत. यामध्ये बटाटा, फ्लॉवर, गाजर आणि मटार घालून मिसळून घ्यावे. त्यानंतर तांदळामध्ये पाणी घालून दोन-तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यावा. यामध्ये पाणी घालायचा. साधारण अर्धा तास तांदूळ निथळण्यासाठी ठेवावा. यानंतर फोडणीनंतर गरम तेलात बारीक चिरलेला कांदा घालावा. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यावा. टोमॅटोही व्यवस्थित परतून घ्यायचा.

टोमॅटो शिजल्यावर आलं-लसूण पेस्ट, धणे पूड, हळद, लाल तिखट, थोडंस मीठ आणि बिर्याणी मसाला, कोथिंबीर, पुदिना घालून मिसळून घ्या. दोन ते तीन मिनिटे शिजवून घ्या. मसाले शिजू लागले की, मॅरिनेट केलेल्या भाज्या घालून घ्या. भाज्या मसाल्यात नीट परतून घ्या. त्यामध्ये साधारण २-३ चमचे पाणी घालून ढवळा. झाकण ठेवून साधारण या भाज्या अर्ध्या कच्च्या राहतील अशा शिजवून घ्यायच्या. भाज्या शिजेपर्यंत भातासाठी पाणी उकळवायचं. उकळलेल्या पाण्यात १ मोठा चमचा मीठ आणि सर्व  खडे मसाले घालायचे.  या पाण्यात २ चमचे तूप घालायचे. पाणी उकळू लागलं की, यामध्ये निथळत ठेवलेला तांदूळ घालायचा. ७-८ मिनिटे शिजवून घ्यायचा.

भाज्या १० मिनिटे अर्धकच्च्या शिजल्यानंतर त्यामध्ये पनीर घालायचं. त्यावर भात पसरायचा. त्यावर केशर पाणी घालायचं. केशरमुळे बिर्याणीला रंग छान येतो. नंतर भरपूर साजूक तूप आणि तळलेला कांदा घालायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुदिन्याची पाने, उकळेल्या भात पाणीही थोडसं वरून घालायचं. आता पातेल्यावर झाकण ठेवून मोठ्या आचेवर ती शिजवून घ्यावी. त्यानंतर मध्यम आचेवर थोडा वेळ शिजवून घ्यावी. त्यानंतर अगदी मंद आचेवर बिर्याणी वाफवावी आणि सर्व्ह करावी.