उपवासी भाज्या

>>वृंदा इनामदार, आहारतज्ञ<<

नवरात्रीचे कडक उपास उपवासी भाज्यांचा समावेश करून आरोग्यदायी करूया…

देवीच्या उपासनेत नऊ दिवसांच्या उपवासाचा सहभाग फार मोठा असतो, आता तर बरीच जणं या उपवासाचा दुहेरी फायदा घेऊ पाहतात. देवीची उपासना आणि वजन कमी करणं ही बऱ्याच जणांची या नऊ दिवसांतील महत्त्वाची ध्येयं असतात. पण यामध्ये बऱ्याचदा चुकीच्या मार्गाने जाऊन प्रकृतीची हानी केली जाते. बरीच जणं केवळ फलाहार आणि दूध यावर राहून वजन कमी करण्याच्या मागे लागतात, पण अशा प्रकारचा आहार हा आपल्या जगण्याचा कायमस्वरूपी भाग होऊ शकत नाही. हे तत्कालीन डाएट बंद केले की कमी झालेले वजनही पूर्ववत होते.

उपवासातही आपण कर्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्त्वे यांचा योग्य तऱ्हेने मेळ घालू शकतो, तर केवळ कर्बोदकांच्या सेवनाने वजन वाढणार नाही. उलट नियंत्रणात राहील आणि त्याला योग्य व्यायामाची जोड दिली तर ते कमीही होईल. उपवासी आहार हा बहुतांशी कर्बोदकांच्या आधारित असतो. साबुदाणा हा यातील मुख्य घटक. शिवाय शिंगाडा, वरीचे तांदूळ इत्यादी घटकही आहेतच. याला संतुलित प्रमाणात दाण्यांची जोड दिली की प्रथिनांची उणीव भरून निघेल. शिवाय फळांच्या जोडीने भाज्यांचा समावेश आहारात केला की उपवास खऱ्या अर्थाने संतुलित आणि आरोग्यदायी होईल. भेंडी, लाल भोपळा, काकडी, सुरण, बटाटा या भाज्या उपवासाला चालतात. अगदी विदर्भात गाजरही उपवासाला चालतं. या भाज्यांचा आपल्या उपवासी आहारात समावेश करूया.

भेंडी

हिरव्या भाज्यांमध्ये भेंडीला महत्त्वाचं स्थान आहे. भेंडीत प्रथिने, कार्बोहायड्रेड, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि तांबे हे पौष्टिक गुणधर्म असतात. या भाजीत फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर असते. वजन नियंत्रणात ठेवणे, पचनक्रिया मजबूत करण्याला मदत होते. भेंडीतील फॉलिक ऑसिड भ्रूण विकास होण्यास लाभदायक आहे.

सुरण

शरीर स्वस्थ, निरोगी ठेवण्यास सुरण अत्यंत गुणकारी आहे. सुरण खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या कॉपरमुळे लाल रक्तपेशींचे प्रमाण वाढते.

काकडी

शरीरातील पाण्याची कमतरता काकडी खाल्ल्याने दूर होते. काकडीचे नियमित सेवन केल्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण संतुलित राहते. यातून जीवनसत्त्व ‘क’ मिळते. काकडीचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्याखालील काळी वर्तुळे नष्ट होतात. दररोज काकडीच्या रसाचे सेवन केल्याने शरीरातील इन्सुलीन तयार होण्याची गती नियंत्रणात राहते. काकडीच्या रसात साखर घालून हा रस घेतल्याने लघवी साफ होते.

गाजर

कोशिंबीर, हलवा, परोठे, ज्यूस अशा अनेक रूपात गाजर खाल्ले जाते. गाजरात कॅल्शियम असल्यामुळे दात आणि हाडे मजबूत होतात. गाजराचे ज्यूस प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते. तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी गाजर खावे.

भोपळा

भोपळ्यामध्ये जीवनसत्त्व अ, इ, क आणि आयर्नचा मुबलक पुरवठा असतो. भोपळ्याचा आहारात नियमित समावेश केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढून वारंवार आजारी पडण्याचे प्रमाण टळते. त्यात फायबर असल्याने शरीरात मेद न वाढता भुकेवर नियंत्रण मिळते. भोपळ्यातील फायबर हृदयातील ब्लॉकेजेस कमी करायला मदत करतात. यातील ऑण्टिऑक्सिडंटमुळे स्तनांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. व्यायामादरम्यान जाणवणारा थकवा कमी होण्यास भोपळ्याची मदत होते. मधुमेहींसाठी भोपळा हा एक उत्तम पर्याय आहे.

बटाटा

जीवनसत्त्व क, बी ६, पोटॅशियम, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस, कार्बोहायड्रेड इत्यादी गुणधर्मांनी युक्त बटाटा खाल्ल्याने पचनशक्ती वाढते, त्वचा तजेलदार होते, रोगप्रतिकारशक्ती वाढते, हृदयविकारांपासून रक्षण होणे, रक्तदाब नियंत्रणात ठेवणे इत्यादी फायदे होतात. बटाटय़ातील फ्लॅवोनॉइड ऑण्टिऑक्सिडंटस कॅन्सरपासून दूर ठेवतात.