भाजीपाल्याचे दर कोसळले; लाखाचा खर्च, उत्पादन ७० हजारांचे

66

सामना प्रतिनिधी । हडोळती

भाजीपाल्याचे दर कोसळल्यामुळे सध्या भाजीपाला उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत आलेले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे. हडोळती येथील शेतकरी शिवा गोरे यांनी दीड एकरात दोडक्याची लागवड केली. सुमारे एक लाख रुपये खर्च केला परंतु भाव कोसळयामुळे केवळ ७० हजार रुपये त्यांच्या पदरात पडले आहेत.

मराठवाडयातील शेतकऱ्यांवर कायम दुष्काळाचे सावट असते. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट. या चक्रात शेतकरी भरडला जात आहे. भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था तर अत्यंत बिकट झालेली आहे. बाजारात दोडक्याला चांगला भाव मिळत असल्यामुळे मागील तीन महिन्यापूर्वी आपण दोडक्याची लागवड करण्याचे ठरवले. दीड एकर शेतीत, ठिबकच्या माध्यमातून दोडक्याचे उत्पादन घेतले. हडोळती आणि परिसरातील शेतकरी दोडक्याची लागवड पाहण्यासाठी येत होते, असे शेतकऱ्याने सांगितले.

आपण केलेल्या कष्टाला फळ येणार असे असतानाच बाजारात विक्रीसाठी नेलेल्या दोडक्याला भावच मिळाला नाही. केवळ २५ रुपये किलो असा दर मिळाला. ७० हजार रुपयांच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. झालेला खर्च आणि मिळालेले उत्पन्न याचा ताळमेळच लागला नाही. काही तरी नवीन करण्याच्या धडपडीतून खर्च करुन दोडक्याची लागवड केली परंतू सुमारे ३० हजार रुपये उत्पादन खर्चात नुकसान सहन करावे लागले आहे.

भाजीपाल्याचे दर घसरले
टोमॅटो १० रुपये किलो, कोबी गट्टा ५ रुपयाला, दुधी भोपळा ५ रुपयांना, फ्लॉवर ५ रुपयांना गट्टा यांसह भेंडी, गवार, कांदा यांचेही भाव कोसळले आहेत. भाजीपाला विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊ लागले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या