उत्तर महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस नाही, भाज्या महागल्या

सामना प्रतिनिधी, धुळे

शहरासह जिल्हयात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन घटले आहे. सध्या नाशिक, जळगाव आणि सुरत येथून मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक होत आहे. यामुळे भाज्यांचे दर ६० ते ८० रुपये किलो झाले आहेत. टोमॅटोने शंभरी गाठली आहे. भाज्यांचे दर वाढल्याने महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे.

धुळे जिल्ह्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे भाज्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने व्यापारी नजीकच्या शहरांमधून भाजीपाला आयात करीत आहेत. यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. धुळे शहराच्या बाजारपेठेत टोमॅटोने शंभरी गाठली आहे. तर वांगी, गिलके, दोडके, कारले सरासरी ६० ते ८० रुपये किलो आहेत. पालेभाज्यांमध्ये मेथी, शेपू आणि कोथिंबीर ४० ते ६० रुपये किलो आहे. मागणीच्या तुलनेत आवक कमी असल्याने भाज्यांचे दर वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत धुळे तालुक्यातील कापडणे, कुसुंबा, शिरुड, मुकटीसह शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातुन भाज्याल्याची आवक होते. यंदा जून महिन्यात पहिला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने सुमारे तीन आठवडे दडी मारली. यामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. गेल्या वर्षीच्या दुष्काळात विहिरींनी तळ गाठल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाल्याचे उत्पन्न घेणे टाळले. यामुळे जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पन्न नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.