भाज्या, फळे महागणार, पेट्रोल, डिझेल दरवाढीची फोडणी

सामना प्रतिनिधी । नवी मुंबई

दररोज होत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे मेटाकुटीला आलेल्या एपीएमसी मार्केटमधील हजारो वाहनचालकांनी आपल्या भाडय़ामध्ये सुमारे २५ टक्के वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या भाजीपाल्याला महागाईची फोडणी बसणार आहे. टेम्पोचालक सध्या नवी मुंबईतून मुंबईत माल नेण्यासाठी ३० रुपये डाग घेतात. दरवाढीनंतर हे भाडे ४० रुपयांच्या घरात जाणार आहे.

एपीएमसीच्या भाजीपाला आणि फळ मार्केटमधून सुमारे एक हजार लहान-मोठय़ा गाडय़ा मुंबई आणि उपनगरांमध्ये मालाची वाहतूक करतात. नवी मुंबईतून दादरला एक टन माल नेण्यासाठी किरकोळ व्यापाऱयांना ६०० रुपये भाडे द्यावे लागते. मात्र जर भाडेवाढ झाली तर एका टनाचे भाडे थेट ७५० रुपयांवर जाणार आहे. सध्या चार दिवस टेम्पोचालक परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. जर पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाहीत तर येत्या १ जूनपासून भाडेवाढ करण्याच्या हालचाली टेम्पो मालक-चालक संघांनी सुरू केल्या आहेत. भाडेवाढ झाली तर महागाईच्या आगीत आणखी तेल पडणार असून मुंबईमध्ये भाज्या आणि फळांचे दर भडकणार आहेत.