कांदळवन उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करणारी चाणजे ग्रामपंचायतीची घंटागाडी जप्त

2

सामना प्रतिनिधी, उरण

कांदळवनामध्ये कचरा टाकून त्याला आग लावून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाणजे ग्रामपंचायतीची घंटागाडी जप्तीची कारवाई वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. उरण तालुक्यातील सिडको हद्दीत असलेल्या कांदळ वनात चाणजे ग्रामपंचायतीकडून कचरा टाकला जात आहे. इतकेच नव्हे तर कांदळ वनात टाकला जाणाऱ्या कचऱ्याला आगी लावून नष्ट करण्यात येत आहे.

अशा या अनधिकृतपणे टाकण्यात येणारा कचरा आणि कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात येत असलेल्या आगींमुळे कांदळाच्या झाडेझुडपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. तसेच आगीच्या धुरामुळे प्रदूषणही होत आहे. चाणजे ग्रामपंचायतीकडून मागील काही महिन्यांपासून सुरु असलेल्या गंभीर प्रकाराकडे मात्र वन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सातत्याने दुर्लक्षच केले जात होते.याबाबत नागरिकांकडून नाराजीही व्यक्त केली जात होती.

अखेर नागरिकांच्या नाराजीही दखल घेत जाग आलेल्या वनविभागाने कारवाई करीत कांदळ वनामध्ये कचरा टाकून त्याला आग लाऊन विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाणजे ग्रामपंचायतीची घंटागाडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (25) जप्तीची कारवाई केली आहे. उरण विभागाचे वनाधिकारी शशांक कदम यांच्या नेतृत्वाखाली वनपाल जासई डी.डी पाटील, वनरक्षक माया भोसले वनरक्षक देवकर यांनी ही कारवाई केली आहे.