‘अल्ला हू अकबर’ म्हणाल, तर गोळी मारणार!

सामना ऑनलाईन । व्हेनिस

इटलीमधील प्रसिद्ध व्हेनिस शहरामध्ये ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास बंदी घालण्यात आली आहे. व्हेनिस शहराचे महापौर ल्युगेई ब्रुगनारो यांनी ही बंदी घातली आहे. स्पेनमध्ये बार्सिलोना शहरात दहशतवादी हल्ला झाल्यानंतर इटलीमध्येही हाय अलर्ट देण्यात आला आहे. या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत महापौर ब्रुगनारो यांनी हे वक्तव्य केले आहे. द टाईम्स वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ब्रुगनारो यांनी, व्हेनिस शहरातील संत मार्क चौकात उभे राहून ‘अल्ला हू अकबर’ म्हणणाऱ्या व्यक्तीला गोळी घालण्यात येईल, असे वादग्रस्त विधान केले आहे. व्हेनिस शहर बार्सिलोना शहरापेक्षा सुरक्षित असल्याचे ब्रुगनारो म्हणाले. बार्सिलोनामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १३ जणांचा मृत्यू झाला होता, तर १२५ जण जखमी झाले होते.

vhenis-mayor

याआधी इटलीमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा प्रयत्न उधळून लावला होता. पोलिसांनी चार दहशतवाद्यांना अटक केली होती. दहशतवादी व्हेनिस शहरातील रिटालो ब्रिज उडवण्याच्या प्रयत्नामध्ये होते असे पोलिसांनी सांगितले.

ब्रुगनारो आणि वाद हे समीकरण त्यांनी महापौरपद स्वीकारल्यापासून सुरू आहे. व्हेनिस शहराचे महापौरपद स्वीकारल्यानंतर ब्रुगनारो यांनी शाळांमधील समलैंगिक संबंधांवर भाष्य करणारी ४९ पुस्तके हद्दपार करण्याच्या आदेश दिला होता. तसेच शहरातील ‘गे’ परेडवरही बंदी घालण्याचा प्रयत्न केला होता.