काही लोक “हिंदू” शब्दाला अस्पृश्य ठरविण्यासाठी झटत आहेत !

सामना ऑनलाईन । शिकागो

विश्व कल्याणाचा थोर विचार मांडणाऱ्या हिंदू धर्माबद्दल गैसमज पसरवून काही विघ्नसंतोषी मंडळी हिंदू या शब्दालाच अस्पृश्य आणि असह्य ठरविण्यासाठी झटत आहेत, असा आरोप हिंदुस्थानचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी शिकागोत बोलताना केला. ते शिकागोतील विश्व हिंदू काँग्रेसमध्ये बोलत होते.

हिंदुस्थान आणि हिंदू धर्म सार्वभौमिक सहनशीलता आणि सर्व धर्मांचा आदर ही हिंदू संस्कृती आहे. कोणत्याही धर्म अथवा पंथाचा द्वेष हिंदू धर्माला मान्य नाही.125 वर्षांपूर्वी स्वामी विवेकानंद यांनी शिकागोतील विश्व धर्म परिषदेत आपले मौलिक विचार मांडून जगाचे हृदय जिंकले होते, असे सांगून उपराष्ट्रपती नायडू म्हणाले, हिंदू धर्माच्या सच्च्या मूल्यांचे रक्षण करण्याची आज नितांत गरज आहे.ज्यामुळे या वैश्विक धर्माबद्दल सूडबुद्धीने अपप्रचार करणाऱ्यांना रोखता येईल. समाजाचे नुकसान करणाऱ्या परंपरा आणि विचारांना तिलांजली देण्याचे काम आमच्या संतपुरुष आणि धर्मसुधारकांनी केलेले आहे. त्यामुळे “हिंदू” शब्दालाच अस्पृश्य ठरविणाऱ्या प्रवृत्तींना पराभूत करण्यासाठी हिंदूंनी एकजुटीने संघर्ष करायला हवा.

सरसंघचालकांनीही केले होते एकजुटीचे आवाहन
स्वामी विवेकानंद यांच्या शिकागोतील दिव्य भाषणाला 125 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल तेथे आयोजित विश्व हिंदू काँग्रेसमध्ये 80 देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.नायडू यांच्याआधी या काँग्रेसमध्ये भाषण करणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही, हिंदू एक झाला तरच या पुरातन धर्माची प्रगती होईल असे विचार मांडले होते. हिंदूंना कुणाचाही विरोध अथवा द्वेष करण्याची गरजच नाही. पण जे लोक समाजात हिंदुत्वाबद्दल गैरसमज पसरवून हिंदू या शब्दालाच बदनाम करीत आहेत त्यांचा वैचारिक विरोध आपल्याला करायलाच हवा, असे प्रतिपादनही भागवत यांनी केले होते. या पुढची विश्व हिंदू काँग्रेस 2022 ला बँकॉक येथे होणार आहे.