भाजप-काँग्रेसमध्ये ‘पॉट’तिडकीच्या भांडणाला सुरुवात

सामना ऑनलाईन, बंगळुरू

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्या असून इथे काँग्रेस आणि भाजपमध्ये जबरदस्त वाकयुद्धाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या सोशल मिडीया प्रमुख यांनी कर्नाटकात प्रचारासाठी आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप भडकली आहे. दिव्यस्पंदना उर्फ रम्या यांनी मोदींवर टीका करताना अशी विधानं नशेत असलेली व्यक्तीच करते असं ट्विट केलं होतं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शेतकऱ्यांच्या एका सभेला संबोधित करताना फळ आणि भाज्यांचे उत्पादन करणारे शेतकरी आमच्या TOP प्राथमिकतेवर आहेत असं विधान केलं होतं. यातील टॉप म्हणजे टॉमेटो, कांदा आणि बटाटा असा अर्थ असल्याचं मोदींनी सांगितलं होतं. काँग्रेसच्या दिव्य स्पंदना यांनी इंग्रजी स्पेलिंग उलटलं केलं आणि ट्विटवरून विधान केलं की असं POT वर असलेली व्यक्तीचं करू शकते. पॉटचा अर्थ इथे नशेत असलेली व्यक्ती असा होता. यामुळे भाजप नेते भडकले आहे.

भाजपच्या सोशल मिडीयाची धुरा सांभाळणाऱ्या अमित मालवीय यांनी राहुल गांधी यांनी प्रश्न विचारला की मणिशंकर अय्यर यांच्यावर ज्या पद्धतीने कारवाई केली तशी दिव्यस्पंदना यांच्यावर होणार की नाही ? भाजपचे प्रवक्त जीव्हीएल नरसिंव्ह राव यांनी म्हटलंय की “पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातील बहुतांश जनतेला तुम्ही कशाबाबत बोलत आहात याची माहिती नाहीये. मात्र तुमच्या नेत्यांनी ही गोष्ट ताब़तोब कळू शकेल. या टीकेमुळे देशातील जनतेचा अपमान झाला आहे मात्र तुमच्या नेत्यांना या विधानामुळे नक्कीच आनंद झाला असेल”. कर्नाटकातील हे शाब्दीक युद्ध निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत थांबणार नाहीये. गुजरातप्रमाणेच कर्नाटकातही एकमेकांवर यथेच्छ आरोप करण्याचं सत्र सुरू झालं आहे. कर्नाटकात या युद्धाची सुरुवात तिथल्या सत्ताधारी काँग्रेसने केलीय. दिवसेंदिवस हे युद्ध अधिक तीव्र होत जाणार यात शंका नाहीये.