या आठवड्यात राम मंदिरावर निर्णय होण्याची शक्यता


सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे 2 ऑक्टोबर रोजी निवृत्त होतील. त्यांच्या जागी रंजन गोगोई हे हिंदुस्थानचे सरन्यायाधीश होतील. मिश्रा यांच्या कारकीर्दीचे शेवटचे पाच दिवस बाकी आहेत. या पाच दिवसांत ते बहुचर्चित खटल्यांचा निर्णय देण्याची शक्यता आहे. त्यात राम मंदिराच्या खटल्याचाही समावेश आहे. मिश्रा यांच्या कारकीर्दीतच 377 कलम रद्दबातल करण्याच्या निर्णय सुनावण्यात आला होता.

1999 इस्माईल फारूकी वि. हिंदुस्थान या खटल्यात पाच न्यायमूर्तींच्या संविधानिक पीठाने निर्णय दिला होता. हा निर्णय पुर्नपरीक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या संविधानिक बेंच समोर पाठवायचे की नाही यावर मिश्रा या आठवड्यात निर्णय देऊ शकतात. तसेच आधारची माहिती फुटल्यास खाजगीपणाचे होणार्‍या कायद्याचे उल्लंघन, एससी/एसटी बढतीत आरक्षण, न्यायलातील सुनवाईची रेकॉर्डिंग, गुन्हेगारांना निवडणूक लढवण्यावर बंदी सबरीमाला मंदिरात महिलांचा प्रवेश तसेच नेत्यांनी वकिली करणे या खटल्यांचावरही सर्वोच्च न्यायालयाने आपले निकाल राखून ठेवले आहेत. हे सर्व खटले महत्त्वाचे मानले जातात. मिश्रा या खटल्यांपैकी कशावर निर्णय देतील यावर देशाचे लक्ष लागले आहे.