सन्मानाने मरण्याचा प्रत्येकाला अधिकार

सामना ऑनलाईन, पुणे

आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, मात्र सन्मानाने मरण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी येथे केले. ते ‘घटनात्मक अधिकारांचे संतुलन’ या विषयावर व्याख्यान देताना पुण्यात बोलत होते.

मृत्युपंथाला लागलेल्या व्यक्तीने इच्छामरणासाठी तयार केलेल्या इच्छापत्राला काही मार्गदर्शक तत्त्वांसहीत मान्यता देणारा ऐतिहासिक निकाल सर्वोच्च न्यायालयाने 9 मार्च रोजी दिला होता. तो निकाल दीपक मिश्रा यांच्या अधिपत्याखालील खंडपीठानेच दिला होता. शेवटचा श्वास कधी घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार मरणासन्न व्यक्तीला असेल असे त्या निकालात न्यायालयाने म्हटले आहे.

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी आपल्या व्याख्यानात सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ऐतिहासिक निकालाचा पुनरुच्चार करतानाच त्याचे समर्थन केले. ‘मृत्युपंथाच्या’ मुद्दय़ावर बोलताना ते म्हणाले की, एखादी व्यक्ती असाध्य आजाराने ग्रस्त असेल आणि ती इच्छामरण मागत असेल तर ती व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकते. शेवटचा श्वास कधी घ्यायचा हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्या बाबतीत त्याच्यावर कोणताही दबाव असता कामा नये.