क्रीडा संघटक प्रल्हाद सावंत यांचे निधन

सामना प्रतिनिधी, पुणे

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार, अॅथलेटिक्सचे भीष्माचार्य, प्रभावी क्रीडा संघटक, पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनचे आधारस्तंभ आणि महाराष्ट्र अॅथलेटिक्स संघटनेचे माजी सचिव प्रल्हाद सावंत यांचे गुरुवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते ६९ वर्षांचे होते. त्यांचा अंत्यविधी १० ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.

प्रल्हाद सावंत यांना पत्रकार नगर येथील राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना सेनापती बापट रस्त्यावरील रत्ना मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनामुळे अॅथलेटिक्ससह राज्याच्या अवघ्या क्रीडा क्षेत्रावर शोककळा पसरली. सावंत यांच्या निधनाचे वृत्त कळताच क्रीडा क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हॉस्पिटल तसेच त्यांच्या घराकडे धाव घेतली.