…म्हणून डॉक्टरनं चक्क दोन हजाराची नोट गिळली!

सामना ऑनलाईन । अहमदाबाद

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकलेल्या एका जनावरांच्या डॉक्टरनं चक्क दोन हजार रुपयांची नोट गिळली. गुजरातच्या पाटण जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला आहे. या लाचखोर डॉक्टरने २ हजारांची लाच मागितली होती. त्याने संबंधित व्यक्तीकडून ही लाच स्विकारली. मात्र हा सर्व आपल्याला जाळ्यात अडकवण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेला सापळा आहे, हे डॉक्टरच्या लक्षात आलं. त्यामुळे अटकेच्या भीतीने पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने चक्क दोन हजारांची नोटच गिळून टाकली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोट बाहेर काढण्यासाठी तातडीने डॉक्टरला रुग्णालयात दाखल केले. शुक्रवारी संपूर्ण दिवस ही प्रक्रिया सुरू होती. लाच प्रकरणात आरोपीनं लाच म्हणून स्विकारलेली नोट कारवाईसाठी महत्त्वाची मानली जाते. पोलिसांकडे या नोटीचा नंबर रजिस्टर असतो. त्यामुळे हा पुरावा नष्ट करण्यासाठीच या डॉक्टरने ती नोटच गिळून टाकली. लाचखोरीच्या प्रकरणातून वाचण्यासाठी आरोपी अनेक युक्ती लढवतात, मात्र या डॉक्टरने उचललेलं पाऊल अगदी विचित्र आहे, अशी माहिती या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यानं दिली आहे.