रेल्वेच्या ‘अनपढ’ धोरणाचे बळी

सामना ऑनलाईन | मुंबई

रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार यांच्यातील समन्वयाचा अभाव हेच आजच्या दुर्घटनेचे मुख्य कारण आहे. प्रचंड वेगाने वाढणारी मुंबईची लोकसंख्या आणि या लोकसंख्येला वाट मोकळी करून देण्यास अपयशी ठरलेले रेल्वे आणि राज्याचे प्रशासन यामुळेच अशा घटनांना निमंत्रण दिले जाते. त्यातच मुंबईतील रेल्वेच्या होत असलेल्या आणि भविष्यात होणाऱ्या विकासाबाबत राज्य सरकारचे कोणतेच नियंत्रण नसल्याने मुंबईबाहेरून आलेले रेल्वेचे अधिकारी आपल्या मनाप्रमाणे विकास करीत असतात आणि जेथे खऱ्या अर्थाने सुविधा हव्यात तेथे त्या मिळत नाहीत आणि जेथे नको आहे तिथे दिल्या जातात. एल्फिन्स्टन येथील आजच्या दुर्घटनेत पडलेले बळी हे रेल्वेच्या याच अनपढ विकासाचे केवीलवाणे बळी आहेत.

उपनगरीय रेल्वेच्या विकासाची जबाबदारी MRVC म्हणजेच मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडे आहे, पण या कॉर्पोरेशनमध्ये सदस्य कोण आहेत, अध्यक्ष कोण आहे, या कॉर्पोरेशनचे कार्यालय कुठे आहे हे राज्य सरकारला माहीत नसावे. त्यामुळे  MRVC चे अधिकारी मनमानीप्रमाणे विकास करीत आहेत. त्यामुळे आजच्या दुर्घटनेला केवळ मध्य किंवा पश्चिम रेल्वे जबाबदार नसून पडद्याआड लपून बसलेले मुंबई राज्य विकास कॉर्पोरेशन आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्यास अपयशी ठरलेले राज्य सरकार असे सारेच जबाबदार आहेत. कारण…

मागील पाच ते सहा वर्षांत दादरनंतर सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून मध्य रेल्वेचे परळ व पश्चिम रेल्वेचे एलफिन्स्टन ओळखली जाऊ लागली आहेत. मध्य रेल्वेच्या परळ, व पश्चिम रेल्वेच्या एलफिन्स्टन आणि लोअर परळ या स्थानकांदरम्यान मागील दहा वर्षांत मोठय़ा प्रमाणात विकास झाला. उंचच उंच रहिवासी इमारतींबरोबरच इंडिया बुल्ससारख्या अनेक उंचच उंच इमारतींत वेगवेगळय़ा कंपन्यांच्या कार्यालयांची स्थापना झाली. त्यामुळे साहजिकच कर्मचारी आणि रहिवाशांच्या संख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली. परिणामी कसारा, कल्याण, कर्जत, खोपोलीपासून विविध कामांकरिता येणारे प्रवासी परळ स्थानकावर उतरू लागले, तर विरार-बोरिवलीकडून येणारे कर्मचारी एलफिन्स्टन स्थानकावर उतरू लागले. आधीच परळ आणि एलफिन्स्टन स्थानकांसाठी एकच पादचारी पूल. त्यात आधीपासून गर्दी होतीच. कारण याच परिसरात केईएम रुग्णालय, वाडिया रुग्णालय, टाटा रुग्णालय आणि शिवडी टीबी रुग्णालय आहेत. त्यामुळे या दोन स्थानकांवर या रुग्णालयांत जाणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची गर्दी असतेच. त्यात इंडिया बुल्सच्या उंंचच उंच इमारतींतील कार्यालयांमुळे या गर्दीत या कर्मचाऱ्यांची भर पडली आणि परळ व एलफिन्स्टन गर्दीने गच्च भरू लागले. अशावेळी या स्थानकांवर तातडीने सुविधा देणे रेल्वे प्रशासन, MRVC आणि राज्य शासनाचे काम होते, पण प्रवाशांनी या पुलाबाबत अनेक वेळा मागणी करूनही यापैकी कोणीही लक्ष घातले नाही. त्यामुळे आज २२ जणांचा नाहक बळी गेला. या गर्दीकडे पाहता रेल्वेने तातडीने सुविधा येथे द्यावयास हव्या होत्या, पण दिल्या नाहीत. त्याउलट खार आणि सांताक्रुझ स्थानकांवरील फलाट क्रमांक ५ व ६ वर एकही गाडी थांबत नाही तरीही तेथे भल्या मोठय़ा पादचारी पुलाचे काम सुरू आहे. यालाच रेल्वेचा अनपढ विकास म्हटले पाहिजे.

पॅसेंजर सेफ्टी ऑडिट सर्व्हे झालाच नाही

उपनगरीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर पॅसेंजर सेफ्टी ऑडिट सर्व्हे केला जातो. या सर्वेच्या वेळी स्टेशन मास्तर, एरिया सुपरवायझर, (RPF) रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि जनरल मॅनेजर यांची मते जाणून घेतली जातात. त्यानुसार आराखडा ठरविला जातो व पुढील कामकाजासाठी रेल्वेच्या कन्स्ट्रक्शन विभागाकडे पाठविला जातो. पण रेल्वेतीलच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अशा प्रकारचे ऑडिट झालेच नसावे.