बक्षिसाच्या रकमेचे काय करणार? प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी मोसमाआधीच दिले जेतेपदाचे संकेत

सामना प्रतिनिधी ।नागपूर

विदर्भाच्या क्रिकेट संघाने सोमवारी दिल्लीला पराभूत करून तब्बल६१ वर्षांनंतर रणजी ही देशातील मानाची स्पर्धा पहिल्यांदाच जिंकत नवा इतिहास रचला. याप्रसंगी या संस्मरणीय जेतेपदाची चाहूल मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांना मोसम सुरू होण्याआधीच लागली होती. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांनी आठवण जागवताना सांगितले की, गेल्या मोसमात चंद्रकांत पंडित यांना करारबद्ध करण्यात आले तेव्हा ते म्हणाले, जेतेपद मिळवल्यानंतर बक्षिसाच्या रकमेचे काय करणार आहात…

कोणत्या जेतेपदाबद्दल बोलत आहात असे चंद्रकांत पंडित यांना विचारले असता ते म्हणाले, रणजी क्रिकेट स्पर्धेबद्दल. यापुढे प्रशांत वैद्य म्हणाले, त्याप्रसंगी चंद्रकांत पंडित यांच्या आत्मविश्वास आवडला. आम्हाला ६१ वर्षांमध्ये जे शक्य झाले नाही ते जिंकण्याचे स्वप्न त्यांनी आधीच बघितले होते. त्यामुळे नागपूरमध्ये त्यांनी पाऊल ठेवल्याच्या पहिल्या दिवसापासून मला त्यांच्यावर विश्वास होता.

आदित्यबद्दल शंका होती पण…
आदित्य ठाकरे या गोलंदाजाबद्दल चंद्रकांत पंडित यांना शंका होती, पण प्रशांत वैद्य यांनी या युवा खेळाडूमधील गुण हेरले आणि विदर्भाच्या संघातील प्रवेशाबाबत आग्रह धरला. आदित्य ठाकरेने जेतेपदाच्या लढतीत ठसा उमटवून प्रशांत वैद्य यांचा विश्वास सार्थ ठरवला अन् १९ वर्षांखालील वर्ल्ड कपचे तिकीटही बुक केले आहे. युवा वर्ल्ड कपसाठी त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. विदर्भाच्या संघात संस्कृती रुजत आहे. सीनियर खेळाडूंकडे बघत ज्युनियर खेळाडू पुढे येत आहेत, असेही त्यांनी पुढे आवर्जून नमूद केले.

विजेत्यांना पाच कोटींचे बक्षीस
६१ वर्षांनंतर विदर्भाला हे यश मिळवून देणाऱया सर्व खेळाडूंचा सत्कार येत्या ५ जानेवारी रोजी नागपुरात विदर्भ क्रिकेट असोसिएशनतर्फे करण्यात येणार आहे, अशी घोषणा विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. आनंद जयस्वाल यांनी इंदूर येथे माध्यमांशी बोलताना केली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे सर्व प्रमुख पदाधिकारी या अंतिम सामन्यासाठी आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता इंदोरला पोहोचले होते. सर्व पदाधिकाऱयांशी चर्चा करून अॅड. आंनद जयस्वाल यांनी हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने दिलेल्या दोन कोटी रुपयांच्या पुरस्कार राशीव्यतिरिक्त तीन कोटी रुपयांची अतिरिक्त राशी या खेळाडूंना पुरस्कार म्हणून या सत्काराच्यावेळी देण्यात येणार आहे असे जाहीर केले. दरम्यान, विजेता संघ उद्या मुंबईमार्गे नागपूरला रवाना होणार आहे.