विदर्भाचे ऐतिहासिक विजेतेपद

सामना ऑनलाईन । इंदूर

रणजी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत धडक मारणाऱया विदर्भाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर ऐतिहासिक विजेतेपदाला गवसणी घालून शिरपेचात मानाचा तुरा रोवला. चंद्रकांत पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱया विदर्भाने सर्वांचे अंदाज खोटे ठरवत किताबी लढतीत ७ वेळच्या रणजी चॅम्पियन दिल्लीचा ९ गडय़ांनी धुव्वा उडवून रुबाबात रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. पहिल्या डावात हॅट्ट्रिकसह ८ बळी टिपणारा रजनीश गुरबाणी या सामन्याचा मानकरी ठरला.

जेतेपदाच्या लढतीत दिल्लीला २९५ धावांवर रोखल्यानंतर विदर्भाने ५४७ धावसंख्या उभारून पहिल्या डावात २५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. त्यानंतर दिल्लीने दुसऱया डावातही २८० धावांवरच शरणागती पत्करल्याने विदर्भाला विजयासाठी अवघे २९ धावांचे लक्ष्य मिळाले. विदर्भाने अवघ्या ५ षटकांत १ बाद ३२ धावांपर्यंत मजल मारून चौथ्याच दिवशी विजयाची औपचारिकता पूर्ण करून देदीप्यमान यशावर शिक्कामोर्तब केले. कर्णधार फैझ फझल (२) खेजरोलियाच्या गोलंदाजीवर पायचित बाद झाल्यानंतर संजय रामस्वामी (नाबाद ९) व वसीम जाफर (नाबाद १७) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

दरम्यान, विदर्भाने सोमवारी सकाळी तिसऱया दिवसाच्या ७ बाद ५२८ धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र १३३ धावसंख्येवर नाबाद परतलेला अक्षय वाडकर चौथ्या दिवशी याच धावसंख्येवर बाद झाला. डावखुरा वेगवान गोलंदाज कुलवंत खेजरोलियाने वाडकरला राणाकरवी झेलबाद करून दिल्लीचा मार्गातील मुख्य अडसर दूर केला. ५६ धावांवर नाबाद परतलेला सिद्धेश नेरळने चौथ्या दिवशी ७४ धावा करून विदर्भाला १६३.४ षटकांत ५४७ धावसंख्येपर्यंत पोहोचविले.

भन्नाट गोलंदाजी

पहिल्या डावात २५२ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतल्यानंतर विदर्भाने गोलंदाजीतही भन्नाट कामगिरी केली. रजनीश गुरबाणी, अक्षय वाखरे व आदित्य सरवटे यांच्या माऱयासमोर दिल्लीचा संघ दुसऱया डावात फार काळ तग धरू शकला नाही. ध्रुव शौरी  (६२)आणि नितीश राणा (६४) यांनी तिसऱया गडय़ासाठी ११४ धावांची भागीदारी रचत विदर्भाचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न अखेर तोकडेच पडले. अनुभवी गौतम गंभीर (३६), कर्णधार वृषभ पंत (३२) यांनाही काही चमत्कार करता आला नाही. शेवटी विकास मिश्राने ३४ धावांची खेळी केली म्हणून दिल्लीला डावाने पराभव टाळता आला. विदर्भाकडून अक्षय काखरेने ४, तर आदित्य सरकटने ३ फलंदाज बाद केले. रजनिश गुरबाणीने २ व सिद्धेश नेरळने एक बळी टिपला.

फायनलपर्यंतचा प्रवास

यंदाच्या रणजी स्पर्धेत विदर्भाच्या संघाने स्वप्नवत कामगिरी केली. पंजाबचा एक डाव आणि ११७ धावांनी पराभव करून विदर्भाने रणजी स्पर्धेच्या मोहिमेला प्रारंभ केला होता. त्यानंतर विदर्भाचा छत्तीसगडविरुद्धचा दुसरा सामना अनिर्णीत राहिला. मग सेनादल, बंगाल आणि गोवा या संघांना विदर्भाने लागोपाठ पराभूत केले. विदर्भाचा आपल्या घरच्या मैदानाकरचा हिमाचल प्रदेशविरुद्धचा अखेरचा सामना हा मात्र अनिर्णीत राहिला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत विदर्भाने केरळचा तर उपांत्य सामन्यात कर्नाटकचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. मग बलाढय़ दिल्लीला नामोहरम करून त्यांनी कारकीर्दीतील पहिले रणजी विजेतेपद पटकावले.

वासीम जाफरची विजयी नवमी

३९ वर्षीय वासीम जाफर या मुंबईकराने विदर्भाचे प्रतिनिधित्व करताना नवव्यांदा रणजी फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव मिळवला. विशेष म्हणजे या सर्व फायनल्समध्ये त्याने प्रतिनिधित्व केलेल्या संघाने चॅम्पियनशिपवर हक्क सांगितलाय. त्याचा प्रदीर्घ अनुभव यावेळी विदर्भाच्या मदतीला धावून आला.

रणजी क्रिकेट स्पर्धेत विदर्भ संघाने याआधी २००२-०३ व २०११-१२ या वर्षांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. मात्र दोन्ही वेळा त्यांना फायनलचे तिकीट मिळाले नाही. शिवाय विदर्भाने १९७०-७१ व १९९५-९६ असा दोन वेळा उपांत्यपूर्व फेरीचा प्रवासही केला होता.

अष्टपैलू आदित्य सरवटे, यष्टिरक्षक अक्षय वाडकर आणि गोलंदाज आदित्य ठाकरे या मराठमोळय़ा खेळाडूंनी विजेतेपदात मोलाचा वाटा उचलला.