भुकेल्या वासराची कुत्री झाली आई, दूध पाजतानाचा व्हिडीओ व्हायरल


सामना ऑनलाईन । शिरूर

शिरुरमध्ये बुधवारी एक अनोखे दृश्य पाहायला मिळाले. येथील एका भटक्या गाईने प्लास्टिक गिळले आणि वाचण्यासाठी रस्त्यावर लोळत ती जिवाच्या आकांताने ओरडत तडफडू लागली. या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉक्टरांनी पाचारण केले आणि तिच्यावर उपचारासाठी बोलावले.

गायीवर उपचार सुरू असताना तिचे छोटे वासरूही त्या ठिकाणी होते आणि भूकेने त्याचाही जीव कासावीस होत होता. त्याचवेळी भूकेने व्याकूळ असलेले वासरू जवळच बसलेल्या कुत्रीजवळ गेले आणि तिचे दूध पिण्याचा प्रयत्न करू लागले. कुत्रीनेही ममता दाखवत त्याला जवळ घेतले आणि दूधही पाजले. एकीकडे कुत्री वासराला दूध पाजत असताना गायीवरही उपचार सुरू होते. डॉक्टरांनी 4 तास प्रयत्नांची पराकाष्ठा करत गायीचे प्राण वाचवले. आई बरी होताच वासराने उड्या मारत तिच्याकडे धाव घेतली आणि दूध पिऊ लागले. कुत्रीची ममता आणि भटक्या गाईला वाचवण्यासाठी धावणाऱ्या लोकांच्या माणुसकीची चर्चा शिरूरमध्ये सुरू होती.