विधान परिषदेची पोटनिवडणूक 3 ऑक्टोबरला

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 3 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होईल, अशी माहिती आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली.

विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर हे विधान परिषदेवर निवडून गेले होते.परंतु, 31 मे 2018 रोजी फुंडकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत असून निवडून आलेल्या सदस्याचा कार्यकाल 24 एप्रिल 2020 पर्यंत राहणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी 14 सप्टेंबरला अधिसूचना जारी होईल. 22 सप्टेंबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. 24 सप्टेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होईल. 26 सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 3 ऑक्टोबरला सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्याचदिवशी संध्याकाळी पाच वाजता मतमोजणी होईल.