विद्या बनली विद्यार्थी, १० दिवसांत बंदूक शिकली

सामना ऑनलाईन । मुंबई
बोल्ड-बिनधास्त आणि सशक्त भूमिकांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री विद्या बालनन आजही विद्यार्थी आहे. आपल्या भूमिकांमध्ये प्राण आणण्यासाठी ती नवनवीन गोष्टी शिकते. ‘बेगम जान’ या तिच्या आगामी चित्रपटासाठी तिने बंदूक चालवण्याचे शिक्षण घेतले आणि अवघ्या १० दिवसात ती चांगली नेमबाज बनली.
‘बेगम जान’च्या शूटिंग दरम्यानचे काही अनुभव तिने व्यक्त केले. आपण आतापर्यंत जितक्या भूमिका साकारल्या आहेत त्यापेक्षा बेगम जानची भूमिका सर्वात आव्हानात्मक असल्याचं विद्या सांगते. तिला या भूमिकेसाठी प्रशिक्षण घ्यावं लागलं. ते तिनं १० दिवसांत पूर्ण केलं.
‘बेगम जान’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीजीत मुखर्जी यांनी या प्रशिक्षणाबद्दल सविस्तर सांगितलं. या भूमिकेसाठी विद्याला घोडेस्वारी आणि बंदूक चालवण्याचा सराव करावा लागला. या चित्रपटाच्या ‘क्लायमॅक्स’ला काही धाडसी प्रसंगांचं चित्रीकरण आहे. त्यासाठी विद्यासह अन्य अभिनत्रींना घोडेस्वारी आणि बंदूक चालवण्याचं प्रक्षिक्षण देण्यात आलं. सुरुवातीला विद्या या प्रशिक्षणाबद्दल साशंक होती, मात्र १० दिवसांच्या प्रशिक्षणानंतर ती खूप चांगल्या प्रकारे बंदूक चालवायला आणि घोडेस्वारी करायला लागली.
हा चित्रपट ‘राजकाहिनी’ या बंगाली चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान फाळणीनंतर नव्यानं तयार झालेल्या एलओसीच्या मध्यावर एका स्त्रीचं घर येतं. देहविक्रय करणाऱ्या या स्त्रीसोबत अन्य काही स्त्रिया राहात असतात. त्या स्त्रियांचा आपलं घर वाचवण्याचा संघर्ष यामध्ये दाखवण्यात आला आहे. १४ एप्रिल रोजी ‘बेगम जान’ प्रदर्शित होणार आहे.