गुजरातमध्ये विद्या बालनचा व्हीव्हीआयपी थाट

सामना ऑनलाईन । भुज

विद्या बालन तिच्या आगामी ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नुकतीच ‘रण महोत्सवात’ गेली होती. यावेळी गुजरातच्या पर्यटन मंत्रालयाने विद्याची शाही बडदास्त ठेवली होती. रण महोत्सवाच्यावेळी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उद्योगपती यांसारख्या व्हीव्हीआयपींसाठी तयार करण्यात आलेल्या अलिशान तंबूत विद्याची राहण्याची सोय करण्यात आली होती. हिंदुस्थान पाकिस्तान सीमेपासून जवळ असलेला हा तंबू बुलेटप्रूफ असून त्यात फाईव्ह स्टार हॉटेलसारख्या सोयी आहेत.

सध्या विद्या बालन तिच्या ‘तुम्हारी सुलू’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतीच तिने या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गुजरातमधील हिंदुस्थान पाकिस्तान सीमेजवळील विगाकोट येथील सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) पोस्टला भेट दिली होती. त्यानंतर ती भुजमधील प्रसिद्ध रण महोत्सवातही गेली. तेथे ती अनवाणी पायाने रणच्या वाळवंटात फिरली, तिच्या चाहत्यांशी संवाद साधला. रणमहोत्सव आयोजित केलेल्या २५ एकरच्या भागात फिरून तिने तिच्या चित्रपटाचे प्रमोशन केले. त्यानंतर मुंबईत परतण्याआधी विद्याला आराम करता यावा यासाठी तिची पंतप्रधान व मोठ्या राजकीय नेत्यांसाठी राखीव असलेल्या अलिशान तंबूत सोय केली होती.