मायावतींवरही येणार चरित्रपट, विद्या बालन भूमिका साकारण्याची शक्यता

1

सामना ऑनलाईन । मुंबई

राजकारण्यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटांची सध्या बॉलिवूडमध्ये रांग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह, तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांच्यावर येणाऱ्या चरित्रपटानंतर आता बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यावर देखील चरित्रपट येणार आहे. अभिनेत्री विद्या बालन मायावती यांची भूमिका साकारणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व बसपाच्या अध्यक्ष मायावती यांच्या आयुष्यावर आधारित चरित्रपटाचे दिग्दर्शन सुभाष कपूर करणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र दिग्दर्शक सुभाष कपूर यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच अभिनेत्री विद्या बालन मायावती मायावती यांच्या भूमिकेत दिसणार आहे. मायावतींच्या भूमिकेसाठी 7 ते 8 अभिनेत्रींच्या नावांची चर्चा होती. मात्र विद्या बालनच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे. विद्या बालन सध्या एका वेबसिरीजच्या चित्रीकरणात व्यग्र असून त्यात ती माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे.