समाधी साधन संजीवन नाम!

>>विद्या राजूरकर<<

द्वैत सिद्धांताचे प्रवर्तक श्री मध्वाचार्य यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार करणाऱ्या श्री रागवेंद्र स्वामी यांचा मंगळवार (28 ऑगस्ट) हा संजीवन समाधी दिन. त्यानिमित्त त्यांच्याविषयी

निर्गुण निराकार ईश्वराचे सगुण साकार स्वरूपातील अवतार म्हणजे संत. आपले ईश्वरी कार्य पूर्णत्वास नेल्यावर समाधिस्थ होऊन पुनश्च निर्गुण निराकार स्वरूपात विलीन होणे म्हणजेच संजीवन समाधी. संत सामर्थ्याने ईश्वरी तत्त्वात विलीन होऊन संजीवन स्वरूपात अस्तित्वात असलेल्या संतांची हिंदुस्थानात अनेक उदाहरणे आहेत. सगळ्याच संतांचे आचरण, उपदेश, साहित्य मानवी आयुष्यात संत सहवासाची अनुभूती देणारे आहे.

दक्षिण हिंदुस्थानातील कुंभकोणम आणि मंत्रालयम या कावेरी आणि तुंगभद्रेच्या काठावर श्री राघवेंद्र स्वामींनी द्वैत सिद्धांताचे प्रवर्तक श्री मध्वाचार्य यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. त्यांना भक्त प्रल्हादाचे अवतार म्हणून मान्यता आहे. ते स्वतः वीणा वादनात पारंगत होते. त्यांनी अनेक सुंदर भजनांची रचना केली आहे. भगवान विष्णू हे त्यांचे आराध्य दैवत. श्रीहरींच्या आदेशाने आंध्र प्रदेश कर्नाटक सीमेवर स्थित मंत्रालयम या तुंगभगद्रेच्या किनारी 1671 साली श्रावण कृ. द्वितीयेला संत श्री राघवेंद्र स्वामींनी संजीवन स्वरूपात समाधी घेतली. तत्पूर्वी त्यांनी भक्तांना केलेला उपदेश हा संत सामर्थ्याची प्रचीती देणारा आहे.

योग्य जीवनपद्धती शिवाय योग्य विचार उत्पन्न होऊ शकत नाहीत. योग्य जीवनपध्दती हे आपले कर्तव्य आहे म्हणून कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपले कर्म हे ईश्वराला समर्पित करा, तोच सदाचार आणि कर्मयोग आहे. गरजूंप्रति केलेले समाजकार्य ही ईश्वरभक्ती आहे. सर्व समाज, जाती, धर्मांप्रति आदर ठेवून सत्कर्म करा; केलेले प्रत्येक सत्कर्म ही ईश्वराची उपासना आहे. संतांनी केलेले चमत्कार हे केवळ ईश्वरीशक्तींची महानता कळावी म्हणून केले आहेत. माझ्या हातून केलेले चमत्कार हे परमेश्वराने प्रदान केलेल्या शास्त्र आणि योगसिद्धीrने साध्य झाले आहेत, म्हणून ज्ञान हाच सर्वात मोठा चमत्कार आहे. जे अज्ञानी केवळ चमत्कार दाखवून स्वतःला गुरू अथवा ईश्वर असल्याचे भासवतात त्यांच्यापासून स्वतःला दूर ठेवा, कारण योग्य ज्ञानाच्या अभावातून झालेले चमत्कार काहीच साध्य करू शकत नाहीत आंधळेपणाने कुणाची भक्ती अथवा अनुनय करणे म्हणजे मूर्खता आहे म्हणून केवळ ईश्वराचे स्वामित्व स्वीकार करा.

भक्तांना आपल्या सदेह समाधिस्थ होण्याचे कारण स्पष्ट करून पुढील सातशे वर्ष श्रीहरीच्या जपातून जो पुण्य संचय होईल तो भक्तांच्या कल्याणासाठी उपयोगात येईल असा शब्द देऊन सहा बाय सहा आकाराच्या 700 शाळिग्रामांनी घडवलेल्या तुळशी वृंदावनात दंड कमंडलू जपमाळ घेऊन हरिनामाचा जप करत श्री राघवेंद्र स्वामी पद्मासनात समाधिस्थ आहेत.

राघवेंद्र स्वामी समाधिस्थ होत आहेत हे त्यांचे शिष्य अप्पणाचार्य यांना माहिती होऊ नये म्हणून त्यांना जाणीवपूर्वक बाहेर पाठवण्यात आले. त्यांना राघवेंद्र स्वामींनी समाधी घेत असल्याचे समजले व ते त्या ठिकाणी पोहचण्यासाठी निघाले व राघवेंद्र स्तोत्राची उत्स्फूर्त रचना अप्पणाचार्यांकडून झाली. त्या स्तोत्रातील 31 व्या श्लोकातला आशय, जो हे स्तोत्र पठण करेल त्याला राघवेंद्र स्वामी संकटातून मार्ग दाखवतील असा होता, अप्पणाचार्य पोहचेस्तोवर समाधिस्थ झालेल्या वृंदावनाचा अखेरचा दगड ठेवण्यात आला होता. अप्पणाचार्यांना त्यांचे अखेरचे दर्शन घेता आले नाही, पण वृंदावनात असलेल्या स्वामींनी ते ऐकले आणि फलादेशाला वृंदावनातून सिद्धता मिळाली. आतून राघवेंद्र स्वामींनी ‘साक्षी हयास्यो अत्रही’ (याला श्री हयग्रीव साक्षी आहेत) म्हणून आशीर्वाद दिले. राघवेंद्र स्वामींच्या भक्तांमध्ये या स्तोत्राचे नित्य पठण होते. हा राघवेंद्र स्वामींचा समाधिस्थ झाल्यावरचा पहिला संजीवन चमत्कार म्हणून मान्यता आहे.

ज्ञानेश्वर माऊलींच्या अभंगात वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानदेवांची राघवेंद्र स्वामींचे किंवा इतर संतांच्या समाधीचे सामर्थ्य हे आजही भक्तांसाठी संजीवनीच आहे.

समाधी साधन संजीवन नाम

शांती दया सम सर्वांभूती

शांतीची पै शांती निवृत्ती दातारू

हरिनाम उच्चारू दिधला तेणें

शम दम कळा, विज्ञान सज्ञान

परतोनि अज्ञान न ये घरा

ज्ञानदेवा सिद्धी साधन अवीट

भक्ती मार्ग नीट हरिपंथी