विद्याधर पानट

‘पानट सर’ या नावाने खान्देशातच नव्हे तर महाराष्ट्रातच पत्रकारिता आणि साहित्य वर्तुळात ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार विद्याधर पानट गेल्या आठवडय़ात काळाच्या पडद्याआड गेले. माध्यमांच्या दुनियेत अलीकडे उथळपणा आणि सनसनाटीला महत्त्व आले असले तरी महाराष्ट्राच्या ‘सभ्य पत्रकारिते’चे जे निवडक प्रतिनिधी म्हणता येतील त्यात पानट सरांचा समावेश होता. संपूर्ण आयुष्य पत्रकारितेत घालविलेले पानट सर स्वभावाने शांत, सरळ आणि मितभाषी होते. पत्रकारितेत आक्रमक आणि संयमी असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे दिसून येतात. पानट सरांची पत्रकारिता सौम्य आणि संयमी, पण ठोस अशीच होती. त्यांच्या सच्छिल पत्रकारितेचे चाहते खान्देशसह बाहेरील भागातही मोठय़ा प्रमाणावर होते. पत्रकारितेत धडपडणाऱया सर्वांसाठीच, मग तो नवखा पत्रकार असो की अनुभवी, पानट सर अनेकांचे गुरू होते. माध्यमांच्या सध्याच्या जगात हा गुण अत्यंत दुर्मिळ झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपल्याजवळ असलेले विचारधन पत्रकारितेत धडे गिरवणाऱया अनेकांना मुक्तहस्ते देणारा पानट यांच्यासारखा ‘पत्रकार गुरू’ विरळाच. ते स्वतः प्रचंड व्यासंगी होते, बहुश्रुत होते. सखोल अभ्यास, व्यापक वाचन असल्याने त्याचा लाभ त्यांना पत्रकारितेत जसा झाला तसा त्यांनी ‘क्रत’ म्हणून स्वीकारलेल्या व्याख्यानांसाठीही झाला. महाराणा प्रताप यांची जीवनगाथा व्याख्यानांच्या माध्यमातून त्यांनी सुमारे दीड कोटी लोकांपर्यंत पोहचविली. त्यासाठी तब्बल तीन हजारांवर व्याख्याने त्यांनी २५ वर्षांत देशभरात दिली. वाचनाच्या ओघात गौरीशंकर ओझा यांचे ‘उदयपूर राज्य का इतिहास’ हे पुस्तक त्यांनी वाचले आणि महाराणा प्रतापच्या शौर्यगाथेने ते अक्षरशः भारावले. इतके की, त्याची शौर्यगाथा व्याख्यानाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्याचा विडाच त्यांनी उचलला. त्यासाठी पायाला भिंगरी लावल्यासारखे ते देशभरात फिरले. महाराणा प्रतापवरील तब्बल ७०० पुस्तकांचा आणि चित्रांचा संग्रह त्यांच्याकडील ग्रंथसंपदेत होता. त्यावरूनही राणा प्रताप यांच्या चरित्राने त्यांना किती झपाटून टाकले होते याची कल्पना येते. स्वतः पानट सरदेखील त्यासंदर्भात बोलताना खूप भावुक होत. ‘मी मराठी’चा पत्रकार आणि इंग्रजीचा प्राध्यापक. त्यामुळे इतिहासाशी तसा फार संबंध कधी आला नाही. मात्र महाराणा प्रताप यांचे चरित्र मला खूप भावले. ते व्याख्यानांतून लोकांपर्यंत पोहचविण्याचा संकल्प मी केला व तो तडीसही नेला’ असे पानट सर स्वतः सांगत. मराठी आणि हिंदी भाषेबरोबरच इंग्रजी आणि उर्दूतील अनेक संदर्भ ते देत. त्यामुळे त्यांचे व्याख्यान रंजक तर होईच, शिवाय त्यांचा श्रोत्यांवर योग्य तो प्रभावदेखील पडत असे. पानट सरांचा स्वभाव शांत आणि संयमी, त्यांची देहयष्टी साधारण आणि एरवीचे बोलणेही हळुवार, पण महाराणा प्रताप यांच्यावरील व्याख्यान देताना त्यांचे सगळे रूपच पालटत असे. एक प्रचंड ऊर्जाच जणू त्यांच्यात संचारत असे. विषय कुठलाही असो त्याची मांडणी, मग ती वक्तृत्वात असो किंवा लिखाणात, ते अत्यंत व्यवस्थित करीत. खान्देशातील पत्रकारिता, साहित्य, शिक्षण, वाचक चळवळ आदी क्षेत्रांत त्यांचा शेवटपर्यंत सक्रिय सहभाग होता. दै. ‘गावकरी’चे संपादक पद त्यांनी अनेक वर्षे सांभाळले. एक अजातशत्रू संपादक म्हणून ते शेवटपर्यंत वावरले. एक साक्षेपी पत्रकार, वक्ता, व्याख्याता, प्राध्यापक, पुस्तक संग्राहक, महाराणा प्रताप चरित्राचे अभ्यासक आणि एक सहृदयी माणूस ही पानट सरांची खान्देशात ओळख होती. आज ते आपल्यात नसले तरी ही ओळख कायमच राहणार आहे.