महाराष्ट्राचे सुपुत्र विजय गोखले नवे परराष्ट्र सचिव

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

मूळचे पुण्याचे असलेले महाराष्ट्राचे सुपुत्र ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी विजय केशव गोखले यांची आज परराष्ट्र सचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. डोकलाम वाद यशस्वी सोडवण्यात गोखले यांची महत्तची भूमिका होती. एस. जयशंकर यांचा त्या पदावरील कार्यकाल जानेवारीअखेरीस संपत असून त्यांच्याकडून गोखले हे परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. त्यांचा कार्यकाल दोन वर्षांचा राहील. त्या पदावरील गोखले हे दुसरे मराठी अधिकारी आहेत.

गोखले हे परराष्ट्र सेवेतील १९८१ सालच्या बॅचचे अधिकारी असून सध्या ते परराष्ट्र मंत्रालयात सचिव (आर्थिक संबंध) या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी या आधी हाँगकाँग, हनोई आणि चीनमध्ये हिंदुस्थानचे राजदूत म्हणून काम केले आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ‘अपॉइंटमेंट कमिटी’ने विजय गोखले यांच्या परराष्ट्र सचिवपदावरील नियुक्तीला मंजुरी दिली, असे कार्मिक आणि प्रशिक्षण खात्याने आपल्या आदेशात म्हटले आहे. आधीचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांची त्या पदावर २९ जानेवारी २०१५ रोजी दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती; मात्र कार्यकाल संपल्यानंतर त्यांना गेल्या वर्षी जानेवारीत एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली होती. विजय गोखले यांच्यापूर्वी पुण्याचेच राम साठे यांनीही परराष्ट्र सचिवपदाची जबाबदारी सांभाळली होती.