कर्नाटक-सौराष्ट्र विजेतेपदासाठी भिडणार

2

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रवींद्र जाडेजा व अर्पित वसावडा यांची अर्धशतके आणि धमेंद्रसिंग जाडेजासह सर्वच गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर सौराष्ट्राने दुसऱ्या उपांत्य लढतीत आंध्र प्रदेशचा ५९ धावांनी धुव्वा उडवून विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. आता किताबी लढतीत सौराष्ट्र आणि कर्नाटक मंगळवार, २७ फेब्रुवारीला भिडतील.

सौराष्ट्राकडून मिळालेल्या २५६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आंध प्रदेशचा डाव ४५.३ षटकांत १९६ धावांत संपुष्टात आला. बोडापती सुमंथ (४२) व द्वारका रवी तेजा (४२) हे मधल्या फळीतील फलंदाज आणि आघाडीवीर श्रीकार भारत (२९) व कर्णधार हनुमान विहारी (२५) यांनीच काय तो सौराष्ट्राच्या गोलंदाजीचा प्रतिकार केला. सौराष्ट्राकडून धमेंद्रसिंग जाडेजाने सर्वाधिक ४ फलंदाज बाद केले, तर शौर्य सनांदियाने २ बळी टिपले.

त्याआधी नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्राने ४९.१ षटकांत २५५ धावसंख्या उभारली. यात समर्थ व्यास (४६), रवींद्र जाडेजा (५६), अर्पित वसावडा (५८) व प्रेरक मंकड (४०) यांनी उपयुक्त फलंदाजी केली. आंध्र प्रदेशकडून कार्तिक रामणने ४ बळी टिपले, तर डी. शिवा कुमार व बंदारू अयप्पा यांनी २-२ फलंदाज बाद केले.