विजय, हुडा, सिराज, सुंदर यांना ‘टीम इंडिया’चे तिकीट

1

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आगामी क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक बघता हिंदुस्थानच्या निवड समितीने रविवारी श्रीलंकेतील तिरंगी ट्वेण्टी-२० मालिकेसाठी सीनियर्सना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना टीम इंडियाच्या संघात स्थान दिले आहे. याप्रसंगी कर्णधार विराट कोहली याच्यासह महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वरकुमार, कुलदीप यादव आणि हार्दिक पांडया यांना विश्रांती देण्यात आली असून रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच डावखुरा सलामीवीर शिखर धवन याला उपकर्णधारपदी बढती देण्यात आली आहे. याचसोबत विजय शंकर, दीपक हुडा, मोहम्मद सिराज आणि वॉशिंग्टन सुंदर या नव्या खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.

हिंदुस्थानच्या खेळाडूंना आगामी महिन्यांत आयपीएलसह इंग्लंड, ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड या महत्त्वाच्या दौऱ्यांमध्ये खेळावयाचे आहे. त्यामुळे ६ ते १८ मार्च या कालावधीत श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी मालिकेत प्रमुख खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आले आहे. यामुळे खेळाडूंवर अतिक्रिकेटचा ताण पडणार नाही. तसेच दुखापतींपासून दूर राहता येईल. महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत दिनेश कार्तिक व ऋषभ पंत हे यष्टिरक्षणाची जबाबदारी स्वीकारतील. श्रीलंकेत ७० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर निदहास ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यामध्ये यजमान श्रीलंकेसह हिंदुस्थान व बांगलादेश या देशांचा समावेश आहे.

हिंदुस्थानचा संघ खालीलप्रमाणे

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत (यष्टिरक्षक).

तिरंगी ट्वेण्टी-२० मालिकेचे वेळापत्रक

६ मार्च : श्रीलंका – हिंदुस्थान
८ मार्च : बांगलादेश – हिंदुस्थान
१० मार्च : श्रीलंका-बांगलादेश
१२ मार्च : हिंदुस्थान-श्रीलंका
१४ मार्च : हिंदुस्थान – बांगलादेश
१६ मार्च : बांगलादेश – श्रीलंका
१८ मार्च : अंतिम सामना